ठाणे: कळवा येथील मनीषा नगर, जय भीम नगर परिसरातील पाईपलाईन क्रमांक २ मधील झोपडपट्टीत असलेल्या गोदामाला शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीची झळ बाजूच्या बेकरीलाही बसली असून आगीत झोपडीत असलेल्या गोदामाचे नुकसान झाले आहे. मात्र आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
इम्रान इसाफ खान यांच्या मालकीची आग लागलेली झोपडी आणि करामत नामक ही बेकरी आहे. झोपडीला त्यांनी गोदाम करून त्यामध्ये इमारत बांधकाम साहित्य, प्लायवुड आणि बांबू ठेवले होते. शुक्रवारी सकाळी अचानक त्या झोपडीला आग लागली. लाकडी साहित्य असल्याने आगीने भीषण रूपधारण केले.या आगीची झळ ही शेजारी असलेल्या बेकरीलाही बसली असून बेकरीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र गोदामाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, संबंधित विभागाला त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून यावेळी एक फायर इंजिन आणि दोन पाण्याचे टँकर पाचारण केले होते. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही दुखापतही झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.