भिवंडी : केंद्रप्रमुखांच्या ढिसाळ कारभारामुळे भिवंडी पालिकेच्या शाळा क्रमांक १४ मध्ये रविवारच्या शिष्यवृत्ती परीक्षेवेळी आठवीच्या विद्यार्थ्यांना पाचवीचा पेपर देण्यात आला. अर्ध्या तासाने पर्यवेक्षकांच्या ध्यानात चूक आली. त्यानंतर चौघांत एक अशी प्रश्नपत्रिका वाटण्यात आली, पण अनेक मुलांना वेळेत पेपर सोडवता आला नाही.शिष्यवृत्तीची परीक्षेत दुपारी दीड ते तीनपर्यंत आठवीच्या विद्यार्थ्यांचा बुध्दिमत्ता व मराठी भाषा हा पेपर होता. शाळा १४ मधील ब्लॉक चारमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुखाने पाचवीचा पेपर वाटला. पेपर पाहताच तो सोपा असल्याचे लक्षात आल्यावर मुलांनी भराभर तो सोडवायला घेतला. उत्तरपत्रिकेत गोल भरले. अर्ध्या तासाने पर्यवेक्षकाने पेपर सोडवणाºया मुलांना तुम्ही आठवीचे विद्यार्थी आहात की पाचवीचे, असा प्रश्न विचारला. जेव्हा समोर बसलेली मुले आठवीची आहेत, हे लक्षात आले तेव्हा पर्यवेक्षकांना काय घोळ झाला आहे, ते समजले. त्यानंतर त्यांनी पटापट मुलांकडील उत्तरपत्रिका गोळा केल्या. अन्य वर्गातून आठवीचे पेपर आणले गेले. जेवढा वेळ उरला होता, त्यात या २४ विद्यार्थ्यांना बुध्दीमत्ता चाचणीचे सहा पेपर दिले. त्यामुळे चार मुलांत एक असे पेपर वाटून घेण्याची वेळ मुलांवर आली.
आठवीच्या विद्यार्थ्यांना पाचवीचा पेपर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:44 AM