- सदानंद नाईकउल्हासनगर : मीना आयलानी मंगळवारी होणाऱ्या महासभेनंतर महापौरपदाचा राजीनामा आयुक्तांकडे देणार आहेत. याबाबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच पक्षाचा आदेश आल्याचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी सांगितले. पंचम कलानी महापौर होणार असल्याने ओमी टीममध्ये उत्साहाचे वातावरण असून, साई पक्षाच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यमंत्री चव्हाण शनिवारी ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी शहरात आले होते.महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी स्थानिकांचा विरोध झुगारून वरिष्ठांनी ओमी टीमसोबत महाआघाडी केली. भाजपाच्या एका निष्ठावंत गटाने ओमी टीमला घेतल्यास सत्ता येईल, असे वरिष्ठ नेत्यांना पटवून दिले. ज्या परिसरातून निष्ठावंत गटाचे नेते व कार्यकर्ते निवडणुकीसाठी उभे राहणार होते, त्या परिसरात ओमी टीमची ताकद कितीतरी पटीने वाढल्याने त्यांच्या सत्तास्थानाला धक्का लागणार होता. माजी आमदार व शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या गटाने मात्र शेवटपर्यंत ओमी टीमसोबत महाआघाडी करण्यास विरोध केला. पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून आयलानी यांना महापौरपदाचे आमिष देऊन शांत केले. सत्ता स्थापनेसाठी नऊ नगरसेवकांची संख्या कमी पडल्याने साई पक्षाला महाआघाडीत सोबत घेण्याची खेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी यशस्वी खेळली. साई पक्षामुळे भाजपाच्या मीना आयलानी महापौरपदी निवडून आल्या, तर साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांना उपमहापौरपदासह अन्य महत्त्वाची पदे दिली. महापौरपदाचे आश्वासन देऊनही मिळत नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला होता. अखेर, वरिष्ठांच्या आदेशानुसार आयलानी महासभा संपल्यानंतर महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत.वर्षभराचाच कालावधीओमी टीमला सव्वा वर्षाऐवजी वर्षभराचा महापौरपदाचा कालावधी मिळणार आहे. एप्रिलमध्ये लोकसभा, तर पुढील वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांच्या आचारसंहितेमध्ये सहा महिने जाणार असून सहा ते सात महिन्यांचा महापौरपदाचा कालावधी ओमी टीमला काम करण्यास मिळणार आहे.आयलानी, कलानी कट्टर विरोधकमीना आयलानी मंगळवारी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोकण विभागीय आयुक्त निवडणूक जाहीर करतील. या प्रक्रियेला एक महिन्याचा अवधी जाणार असून यादरम्यान गडबड होऊ नये, म्हणून सत्तेची चावी असलेल्या साई पक्षाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. आमदारपदासाठी आयलानी व कलानी दोघेही इच्छुक असून भाजपा कुणाला तिकीट देणार, याबाबतची चर्चा सुरू आहे.
पंचम कलानी होणार उल्हासनगरच्या महापौर, ओमी टीममध्ये उत्साहाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 4:21 AM