- अजित मांडकेठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत शिवसेनेच्या महिला उमेदवार दीपाली सय्यद यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेत अनेक इच्छुक असतानाही श्रेष्ठींनी अचानकपणे दीपाली यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. परंतु, स्थानिक शिवसैनिकांच्या हे अद्यापही पचनी पडलेले नाही. केवळ एक अभिनेत्री म्हणूनच त्यांची ओळख असली तरी, मतदारांमध्ये त्यांची किती छाप पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आव्हाडांना मागील निवडणुकीतही घेरण्यासाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखण्यात आली होती. परंतु, तरीसुद्धा त्यांना सर्वाधिक मते मिळाली होती. आता तर समाजवादी, एमआयएम आणि वंचित आघाडी निवडणुकीत नसल्याने राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आव्हाड यांचा कामावर, तर सेनेचा उमेदवाराच्या करिष्म्यावर भर आहे. दीपाली यांना शिवसेनेने अचानक उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.जमेच्या बाजूजितेंद्र आव्हाड हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून मागील १० वर्षे विकासकामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. कळवा स्टेशन, मुंब्रा स्टेशन आदींसह येथील प्रत्येक रस्ता, छोट्यामोठ्या गल्ल्या या सिमेंट काँक्रिटचे केल्या आहेत. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. दांडगा जनसंपर्क, जनतादरबार घेऊन घराघरांत पोहोचलेले म्हणून त्यांची ओळख आहे.एक मराठी सिनेअभिनेत्री म्हणून दीपाली यांची ओळख आहे. शिवाय, मुंब्य्रातील मते मिळविण्यासाठी सय्यद हे आडनाव त्यांना फायदेशीर ठरू शकणार आहे. तर, दीपाली हे नाव कळव्यात चालू शकणार आहे. दीपाली यांनी महिला सक्षमीकरणाची अनेक कामे केली असून अहमदनगर, कोल्हापूर येथे सामाजिक कार्यामध्ये त्या सक्रिय राहिल्या आहेत. मातोश्रीच्या पसंतीच्या उमेदवार ही जमेची बाजू मानावी लागणार आहे.उणे बाजू
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते बाहेर पडल्यामुळे सध्या पक्ष कठीण अवस्थेतून जात आहे. काँग्रेसची परिस्थिती अधिकच बिकट असल्याने मित्रपक्षाची साथ लाभणार नाही. अशा आव्हानात्मक परिस्थितीत ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवण्याचे दडपण त्यांच्यावर असणार आहे. आक्रमकता आणि संयम यांचा समतोल सांभाळताना त्यांना तारेवरील कसरत करावी लागेल.दीपाली सय्यद अभिनेत्री असल्या तरी त्या बाहेरील उमेदवार असल्याने स्थानिक त्यांना आपलेसे करतील का, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. स्थानिक शिवसैनिकांची आणि इच्छुकांची नाराजी दूर करण्यात सेना नेतृत्व अपयशी ठरले आहे. शिवाय, मुंब्रा-कळव्याची थोडीही माहिती त्यांच्याकडे नाही, एका रात्रीत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवीन चेहरा हा सुद्धा त्यांच्यासाठी मायनस पॉइंट मानला जात आहे.