- कुमार बडदे मुंब्रा : पतीने व्हॉट्सअॅपवरून तिहेरी तलाक दिला म्हणून नवीन कायद्यान्वये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणारी जन्नत बेगम इम्तियाज पटेल (३३) ही एमबीए झालेली असून आपल्याला कस्पटासमान वागणूक देणाऱ्या पतीला अद्दल घडवण्याची तिची तीव्र इच्छा आहे. पोलिसांनी आपल्या पतीला तत्काळ चौकशीकरिता बोलवावे, अशी तिची मागणी आहे. त्यानंतर, आपण दाखल केलेल्या तक्रारीचे काय करायचे हे ठरवू, असे तिने सांगितले. स्त्रीला क्षुल्लक समजणाºया पुरुष जातीला कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणण्यावर ती ठाम असल्याचे जाणवते.जन्नतने तिचा पती इम्तियाज पटेल याच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे, तो तिचा दुसरा पती आहे. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यावर तिने इम्तियाजसोबत निकाह केला. माझा पहिला पती व त्याचे नातलग याबद्दल मला काही बोलायचे नाही. कारण, तो विषय माझ्याकरिता यापूर्वीच संपला आहे. मी तक्रार दाखल केल्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको, असे ती म्हणाली.जन्नत अॅकॉर्ड गृहसंकुलातील फिरदोस अपार्टमेंटमध्ये तिचे वडील गुल महंमद पटेल यांच्यासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी मुंब्रा, दिवा परिसरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. पटेल यांच्या तब्बल ११ शाळा अनधिकृत असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर सुटले आहेत. जन्नतने पतीविरोधात तक्रार केल्यामुळे मुस्लिम समाजातील काही मंडळी नाराज झाली आहे. तशी नाराजी प्रकट करणारे फोन व मेसेज आल्याने जन्नत सध्या वडिलांच्या घरी राहत नाही. तिने आपल्या नातलगांकडे आसरा घेतला आहे. आपल्या कृतीने चिडलेले लोक काय करतील, याबाबत ती साशंक आहे.जन्नतने तिहेरी तलाकबाबत नव्याने करण्यात आलेल्या कायद्यानुसार तक्रार दाखल केल्याची चर्चा मुंब्रा परिसरात सध्या जोरात सुरू आहे. एकीकडे मुस्लिम बुद्धिजीवीदेखील या कायद्यातील पुरुषाच्या अटकेच्या तरतुदीमुळे महिलांना न्याय मिळण्याबाबत साशंक आहेत, तर त्याचवेळी कायद्यामुळेच पीडित महिलांना न्याय मिळण्याचा आशावाद जन्नत व तिच्यासारख्या काही मोजक्याच महिलांमध्ये निर्माण झाला आहे. मोबाइलवरून तलाक दिलेल्या नवºयाने आपल्याला कस्पटासमान समजले, ही जन्नतची खंत आहे.जन्नतच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर २०१५ मध्ये इम्तियाजबरोबर तिचा निकाह झाला होता. दोघांचाही हा दुसरा विवाह होता. जन्नत सुशिक्षित असल्याने व तिच्या वडिलांच्या शाळा असल्याने इम्तियाजला त्याच्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडून पैशांची अपेक्षा होती. पैसे देण्यास जन्नतने असमर्थता दाखवल्याने इम्तियाजने तिचा छळ सुरू केला. त्यामुळे जन्नत त्याला सोडून वडिलांच्या घरी राहायला आली. त्यावेळी ती इम्तियाजपासून गरोदर होती. इम्तियाजला तिसरा निकाह लावायचा असल्याने त्याने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी व्हॉट्सअॅपवरून जन्नतला तलाक दिला. या प्रकाराने ती कमालीची दुखावली. जन्नतने जानेवारी महिन्यात बाळाला जन्म दिला.मूल जन्माला आल्यावर त्याच्या ओढीने तरी इम्तियाज येईल, ही अपेक्षाही फोल ठरली. आता तिचे बाळ सहा महिन्यांचे झाले. पण, त्याला बघण्याकरिताही इम्तियाजला यावेसे वाटले नाही, या कल्पनेने जन्नतला अतीव दु:ख झाले. यामुळेच जन्नतने गुन्हा दाखल करून हा लढा पुकारण्याचा निर्णय घेतला.इम्तियाजने मुलाची जबाबदारी घेतली नाही, तरी भविष्यात स्वावलंबी होण्याची आणि बाळाला मोठे करण्याकरिता नोकरी करण्याची जिद्द जन्नतमध्ये आहे. बेकायदेशीर तलाक दिलेल्या इम्तियाजला पोलिसांनी चौकशीला बोलवावे, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी, हा जन्नतचा हेतू आहे. त्यानंतर, ती दाखल केलेल्या तक्र ारीबाबत पुढील निर्णय घेणार असल्याचे तिनेच सांगितले.
पुरुषी वर्चस्वाच्या प्रवृत्तीशी जन्नतचा निकराचा लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 12:34 AM