------------
सोन्याची चेन लंपास
कल्याण : पूर्वेतील लोकधारा परिसरात राहणारे अमोल शिसोदे हे पत्नीसह रविवारी सकाळी ७ वाजता दूध घेऊन उदयगिरी बिल्डिंगच्या समोरून घरी चालत जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीने आलेल्या चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पोबारा केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------
पाळीव बोक्याला जाळून मारले
डोंबिवली : पूर्वेतील जुना आयरे रोड परिसरातील अर्जुन दर्शन सोसायटीत राहणाऱ्या डॉ. मोनाली निफाडकर यांच्या पाळीव बोक्याला अनोळखी व्यक्तींनी जाळून मारल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान घडली आहे. निफाडकर यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
--------------
५९ हजार रुपये लंपास
कल्याण : नीलेश सूर्यवंशी यांचे बिर्ला कॉलेज रोडवर प्रसाद फूड डिव्हाइन हॉटेल आहे. या हॉटेलमधील मॅनेजर इंद्रा खेम कडल (मूळ रा. नेपाळ) याच्याकडे सूर्यवंशी यांचे ४२ हजार रुपये जमा होते. त्या रकमेसह विजय नायडू यांच्या लॉकरमधील १७ हजारांची रोकड असे एकूण ५९ हजार रुपये रोकड इंद्राने चोरून नेल्याची तक्रार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
-------------------
अंगावर गरम तेल फेकले
कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडी आनंदवाडी परिसरात रूबिना शेख व सायरा शेख या जावा शेजारी-शेजारी राहतात. त्या दोघींमध्ये मागील महिन्यात घरगुती कारणांवरून भांडण झाले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, रूबिना ही सोमवारी सकाळी ११ वाजता तिच्या घरासमोर कपडे धूत असताना सायरा हिने मागच्या भांडणाचा राग मनात धरून रूबिनावर गरम तेल फेकले. यात तिच्या चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर, पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी रूबिना हिच्या तक्रारीवरून सायराविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------
मोबाइलची चोरी
कल्याण : पूर्वेतील लोकग्राम परिसरात राहणारे सोनाजी गंगेवार हे गुरुवारी सकाळी ६.४५च्या सुमारास मुंबई येथे कामावर जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी गंगेवार यांच्याकडील ६० हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------
उघड्या दरवाजावाटे चोरी
डोंबिवली : पश्चिमेतील डॉन बॉस्को शाळेजवळील पांडुरंग निवास येथे राहणाऱ्या निशा म्हात्रे यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. चोरट्याने त्याचा फायदा घेत घरात शिरून मोबाइल फोन, फिटनेस घड्याळ, पर्स असा २८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------