मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेत टेंडर सेटिंग आणि टक्केवारीचे होणारे आरोप नवीन नाहीत. त्यातच महापालिका मुख्यालयात बांधकाम विभागाची निविदा भरण्यावरून दोन कंत्राटदारांमध्ये मंगळवारी दुपारी हाणामारी झाली. या घटनेनंतर पालिकेने चिडीचूप राहणे पसंत केले असून भाईंदर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
मीरा- भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयातील चौथ्या मजल्यावर बांधकाम विभाग आहे. मंगळवारी शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या दालनांना लागूनच कंत्राटदार राजू सिंग व कुणाल जोशी यांच्यात बांधकाम विभागाची निविदा भरण्यावरून वाद सुरु झाला. जोशी यांच्या कंपनीने मीरा रोडच्या एका रस्त्याच्या कामाची निविदा भरल्याने राजू व जोशी यांच्यात वाद झाला. त्यावरून शिवीगाळ आणि नंतर हाणामारी झाली. राजू यांच्या तोंडाला मार लागून रक्त वाहू लागले . उपस्थितांनी दोघांमधील भांडण सोडवले.
दोघेही भाईंदर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. राजू यांच्या तक्रारीवरून कुणाल जोशीवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतरही महापालिका प्रशासन व सत्ताधारी - विरोधकांनी मूग गिळून गप्प राहणे पसंत केल्याचे सध्या तरी चित्र आहे. मीरा- भाईंदर महापालिकेत टेंडर आणि टक्केवारीचे आरोप नवीन नाहीत. कामाचे देयक काढायचे असेल तर टक्के मागणाऱ्या पालिका अधिकाऱ्यास लाच घेताना तसेच काम मिळाले म्हणून लाच देताना कंत्राटदारास पकडल्याचे गुन्हे दाखल आहेत. निविदा भरण्यावरून या आधीही मारामारी, भांडणांचे प्रकार घडले आहेत.
नेमके सीसीटीव्ही बंदपालिकेच्या चौथ्या मजल्यावर ज्या ठिकाणी मारामारी झाली त्या भागाचे पालिकेचे सीसीटीव्ही नेमके बंद होते त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर पालिकेने नागरिकांना एकीकडे पालिका प्रवेशासाठी वेळेचे बंधन घातले असताना कंत्राटदार मात्र खुशाल पालिकेत फिरतात अशी टीकेची झोड उठली आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.