कल्याण : कोरोनाची लस घेण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. शहरातील होली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी सकाळी दोन तरुणींमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लसीकरण आता हाणामारीवर येऊन पोहोचल्याचे या घटनेतून उघड होत आहे.
होली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहण्यावरून दोन तरुणींमध्ये वाद झाला. पुढे त्याचे रूपांतर भांडणात व हाणामारीत झाले. केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी ही हाणामारी सोडविल्यावर प्रकरण कुठे शांत झाले. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु, या संदर्भात केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. या दोन्ही तरुणींची नावे कळू शकलेली नाहीत.
सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता रेल्वे प्रवास आणि मॉल प्रवेशासाठी नागरिकांना दोन डोसची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेले नागरिक दुसरा डोस मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. तर, एकही डोस न घेतलेले नागरिक पहिला डोस घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारकडून पुरेसे डोस मिळत नसल्याने मनपाला अनेकदा लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. लसीकरणासाठी नागरिक मध्यरात्री १२ वाजल्यापासून रांगा लावतात. ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने लसीकरण केले जाते. ऑफलाइन लसीकरणासाठी केंद्रांवर टोकन वाटप केले जाते. मात्र लसीकरणाच्या रांगेत उभे असताना नागरिकांचे वाद होतात. अनेक वेळ रांगेत उभे राहिल्यामुळे नागरिकांना भोवळ आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लसीकरण नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. तर, दुसरीकडे शनिवारी लसीकरणाच्या रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.
लसीकरणात सातत्य ठेवा
हाणामारी व भोवळ आल्याच्या घटना लक्षात घेऊन प्रशासनाने लसीकरणात सातत्य ठेवले पाहिजे. सरकारकडून जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध करून देऊन लसीकरणाचा प्रक्रिया सुकर केल्यास दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------