ठाणे - कर्करोगावर मात करत दिव्याने १०वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कोरोना महामारीत विद्यार्थ्यांना शाळेपासून दोन वर्षं मुकावे लागले. यात दिव्याचादेखील समावेश होता. या दरम्यानचा काळात दिव्याला दम लागणे सुक्या खोकल्याची लागण झाली. त्यामुळे पालकांनी दिव्याची कोरोनाची त्वरित तपासणी केली. परंतु ती या टेस्टमध्ये निगेटिव्ह आली. दिव्याच्या तब्येतीत सुधारणा होत नासण्याने डॉक्टरांनी सिटी स्कॅनचा सल्ला दिला. सिटी स्कॅन केले असता त्यात दिव्याला कर्करोग असण्याचा अंदाज व्यक्त केला.
या दरम्यान दिव्या आपल्या गावी वाकलवाडी पुणे येथे होती. तिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि तिला कर्करोग असल्याने निदर्शनास आले. पुढील उपचारासाठी दिव्याला टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिव्याला केमो थेअरिपीसाठी ठाणे ते परेल हा प्रवास ९ महिने करावा लागला. त्यात तिला १४ वेला रक्ताची गरज आणि १५ वेळा प्लेटलेट्स कमी पडल्याने पांढऱ्या पेशींची गरज भासली. या कठीण काळात पालकांनी दिव्याला १०वी ची परीक्षा न देण्याचा सल्ला दिला परंतु दिव्याने परीक्षा देण्याचा हट्ट धरला आणि पालकांनी तिला परवानगी दिली. या परीक्षेच्या काळात दिव्याला शेवटचे तीन पेपर असताना नागीण या रोगाची लागण झाली. दिव्याचे कर्करोगावर अजूनही उपचार चालू आहेत. अशा कठीण परिस्थितीत देखील दिव्याच्या जिद्दीमुळे तिला घवघवीत यश मिळाले. तिनं या परीक्षेत ८१.६० टक्के गुण मिळवले.