----------------------------------------------
पर्स लांबविली
कल्याण : पश्चिमेकडील आधारवाडी साई कल्याणधाम या ठिकाणी राहणाऱ्या शीला पालवे या रविवारी दुपारी १२ वाजता झुंजारराव मार्केट येथील ओधो किराणा स्टोअर्स दुकानासमोर रांगेत उभ्या असताना चोरट्याने त्यांच्या पिशवीतील तीन हजार ५७० रुपयांची रोकड असलेली पर्स लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------
दुचाकी चोरीला
कल्याण : सतीश बरनवाल यांनी त्यांची दुचाकी ३० मार्चच्या मध्यरात्री कल्याण रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात सिद्धार्थनगर या ठिकाणी पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेली असून, याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------------------
सिक्युरिटी गार्ड जखमी
कल्याण : भिवंडी महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर सिक्युरिटी गार्डचे काम करणारे संदीप हजारे हे रविवारी रात्री १०.३० वाजता रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या परिसरातून दुचाकीवरून जात असताना अन्य एका भरधाव दुचाकीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी अनोळखी दुचाकीचालकाविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------------------------
दोघांना मारहाण
कल्याण : पूर्वेकडील लोकग्राम परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पत्त्यांचा डाव खेळत असताना शिवाजी राठोड यांचे मित्र वसंत जाधव याच्याशी भांडण झाले. हा वाद चालू असताना त्या ठिकाणी आलेल्या सूरज भोईर आणि त्याच्या भावाने कोणतेही कारण नसताना शिवाजी आणि त्यांचा भाऊ संतोष याला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी शिवाजी यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सूरज भोईर आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------------------