ठाणे : लोकलमधून तरुणाला फेकल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने आरोपीचा कसून तपास सुरू केला आहे. अखेर गुरुवारी त्या आरोपीचे रेखाचित्र रेखाटून जारी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.मुंब्य्रातील जासीर शेख (१९) हा तरुण मंगळवारी रात्री १०.२८ च्या धीम्या बदलापूर लोकलने ठाण्यातून मुंब्य्रात जाण्यासाठी मालडब्ब्यात चढताना त्याचा धक्का आरोपीला लागला. त्यातून त्यांच्या बाचाबाची होऊन वाद झाला. तो आतील सहप्रवाशांनी सोडवला. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल सुटल्यावर जासीर हा डब्ब्याच्या दारवाज्यातच उभा होता. त्यावेळी आरोपीचा पाय त्याच्या पायाला लागत असल्याने त्याने सांगितले. त्यातून त्या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होऊन भांडण झाले. याचदरम्यान आरोपीने जासीर याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथ मारून लोकलमधून खाली पाडले. ही घटना कळवा-खारेगाव फाटकाजवळ घडली. त्यामध्ये जासीरच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पोलिसांनी आरोपीला पाहिलेल्या जासीर आणि अन्य साक्षीदारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांनी केलेल्या वर्णनावरून रेखाचित्रकाराने आरोपीचे रेखाचित्र रेखाटल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता, त्याच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.