लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या आदिवासी कुटुंबावर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे . त्या स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बनावट लोक व बनावट कागदपत्रां द्वारे कटकारस्थान करून लुबाडण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून आमची जमीन आम्हाला परत करा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री पासून मीरा भाईंदर - वसई विरारच्या पोलीस आयुक्तां कडे केली आहे.
मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले . त्यांच्या वारसांनी केलेल्या तक्रारी नुसार मोतीराम जाबर हे आमचे आजोबा असून ते स्वातंत्र्य सैनिक तसेच आदिवासी कुटुंबातील होते . १९७३ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वाक्षरीने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र देण्यात आले होते . काही वर्षां पूर्वी मीरा भाईंदर महापालिकेने देखील त्यांच्या वारसांना सन्मानपत्र दिले होते.
आजोबांची १९५१ साला पासून संरक्षित कुळ म्हणून मौजे मिरे सर्व्हे क्र . १२७ / १ व नवीन ७ / १ मध्ये नोंद होती व ते त्याठिकाणी शेती करत होते . परंतु १९६३ साली जमीन आजोबांची जमीन हडपण्यासाठी मोतीराम जाबर यांच्या ऐवजी मोतीराम काळ्या पाटील या नावाच्या बोगस व्यक्तीला पुढे करून त्या नावाने खोट्या सह्या व खोटी कागदपत्रे सादर केली .
आश्चर्य म्हणजे १९७२ साली सातबारा नोंदी मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . स्वातंत्र्य सैनिक व आदिवासीचे संरक्षित कुळ असताना पटेल व इत्तर यांचे कुळ कसे लागू शकते ? तर तहसीलदार यांनी २०१५ साली आम्हास आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम काळ्या जाबर यांचे वारस म्हणून संरक्षित कुळ म्हणून घोषित केले होते . तसा आदेश त्यांनी दिला होता .
मात्र संबंधित लोकांनी आमच्या आजोबा व नंतर आम्हा वारसांच्या अज्ञानी - अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला आमच्या राह्यता घरातून आणि शेत जमिनीतून गुंडगिरी - दहशत माजवून बळजबरी हुसकावून लावले. आदिवासी संरक्षित कुळ असल्याने सदर जमीन विक्री व विकसित करण्यात अडचण येऊ नये म्हणून आधी पाटील नावाची बोगस व्यक्ती चे नावाचे पत्र देऊन आणि नंतर मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . नंतर पटेल यांचे कुळ काढून घेऊन जयराज देविदास व इतर यांनी स्वतःची नावे सात बारा नोंदी लावून घेतली असल्याचे स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी सांगितले .
स्वातंत्र्य सैनिक व आदिवासी जमातीतले मोतीराम जाबर यांची तसेच त्यांचे वारस आदिवासी कुटुंबाची फसवणूक व अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा . आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी लेखी अर्ज द्वारे भानुमती करसन बरफ , असीना परशुराम वरठा , सोनल महेंद्र जाबर सह अन्य वारसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शासकीय अधिकारी तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडेय आदींना केली आहे .
स्वातंत्र्य सैनिकाचे हे आदिवासी वारसदार घरकाम , मजुरी आदी कामे करून चाळीत वा भाड्याच्या घरात राहून हलाखीचे जीवन जगत आहेत . कोट्यवधी रुपयांची जमीन असून देखील काही विकासक , कारस्थानी व अधिकारी यांच्या संगनमता मुळे हक्काची जमीन बळकावली गेल्याचे त्यांनी सांगितले .