सदानंद नाईक, उल्हासनगर: हरविल्याची तक्रार नव्हे तर लव्ह जिहादचा गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पुलपगारे यांना आमदार नितेश राणे यांनी करून धारेवर धरले. भाजप नेते प्रदीप रामचंदानी व कपिल अडसूळ यांनी सदर प्रकार उघड केला असून मुलीचे आई वडील भीतीच्या छायेत असल्याची माहिती अडसूळ यांनी यावेळी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणाऱ्या मुलीला शहाड फाटक येथील मुस्लिम मुलाने लग्नाचे आमिष दाखवून पश्चिम बंगाल येथे पळून नेले. पोलिसांनी सुरवातीला आई व वडिलांच्या तक्रारीवरून मुलगी हरविल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस तपासात मुलीचा शोध घेऊन, व्हिडीओ कॉल द्वारे मुलीच्या आई-वडिला सोबत बोलू दिले. मूलगी व मुलगा सज्ञान असून दोघे समतीनें पळून गेले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. असे सहायक आयुक्त मोतीचंद राठोड यांचे म्हणणे आहे. भाजप नेते प्रदीप रामचंदानी व कपिल अडसुळ यांनी मुलीला मुस्लिम तरुणाने पळून नेल्याचा प्रकार लव्ह जिहाद या मधील असल्याचे म्हणणे आहे. मुलीसह तीच्या आई-वडीलाला न्याय देण्यासाठी सदर प्रकार आमदार नितेश राणे यांच्या कानावर घातला. घटनेचे गांभीर्य बघून आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता उल्हासनगर पोलीस ठाण्याला भेट दिली.
यावेळी सहायक आयुक्त मोतीचंद राठोड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे यांना गुन्हा दाखल का केला नाही? याबाबत आमदार राणे यांनी जाब विचारला. लव्ह जिहादचा प्रकार असून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मुलीच्या आई वडिलांना मारहाणीचा जाब विचारला. गुन्हा दाखल केला नाहीतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून प्रकार सांगणार असल्याचा दम राणे यांनी भरला. एकूणच पोलीस राणे यांच्या टार्गेटवर आले असून गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.