ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा हिने बनावट ओळखपत्र तयार करून लस घेतल्यानंतर आणखी २५ बेकायदा ओळखपत्रे देऊन १५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची बाब उघड झाली. तसेच आणखी एक अभिनेत्री सौम्या टंडन हिलाही ओळखपत्र देण्यात आल्याने त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. याप्रकरणी ओळखपत्र देणाऱ्या ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केल्यानंतर अखेर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले. राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले असताना, ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर ओळखपत्र तयार करून तब्बल १५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अशी २५ ओळखपत्रे तयार करण्यात आली असून, तसा अहवाल चौकशी समितीने आयुक्तांना सादर केला आहे. भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण म्हणाले की, ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. ही कंपनी दोषी असून, त्यांच्याच माध्यमातून ही ओळखपत्रे देण्यात आल्याचे दिसत आहे.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले असताना बनावट ओळखपत्र देऊन काही नागरिकांचे बेकायदेशीर लसीकरण केले आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. २५ ओळखपत्रे तयार करण्यात आली असून, तसा अहवाल चौकशी समितीने आयुक्तांना सादर केला आहे. विक्रांत चव्हाण यांनीही दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या प्रकरणात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले.
अभिनेत्री मीरा चोप्रा, सौम्या टंडनवर गुन्हा दाखल करा; स्थायी समिती सभापतींचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 8:08 AM