मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील १७ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह महापौर, महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करून वारंवार तक्रारी करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सतत खोट्या तक्रारी करणाऱ्यांनी काय जनहित साध्य केले याची चौकशी करून त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या १७ अधिकाऱ्यांनी केली आहे.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीतसह चंद्रकांत बोरसे, सुदाम गोडसे, अविनाश जाधव, राज घरत, संजय दोंदे, नितीन मुकणे, नरेंद्र चव्हाण, जगदीश भोपतराव, किरण राठोड, यतीन जाधव, सुनील यादव, दिलीप जगदाळे, चारुशीला खरपडे, मंजिरी डिमेलो, दीपाली जोशी, दामोदर संख्ये अशा १७ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, स्थायी समिती सभापती दिनेश जैन आदींना तक्रार अर्ज दिला आहे.
तक्रार अर्जात मीरा-भाईंदर महापालिका आस्थापनेवर एक हजार २२५ अधिकारी-कर्मचारी असून, तो अपुरा असल्याने अर्जांवर कारवाईस विलंब होत असतो. तसेच नजरचुकीने चुकादेखील होत असतात; परंतु काही माहिती अधिकार कार्यकर्ते हे सर्व विभागात जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने वारंवार अर्ज करतात. माहिती अधिकार अर्जांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने निपटारा करणे अशक्य होत चालले आहे. शिवाय माहिती अधिकाराचे अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष कर्मचारीही नाहीत.
माहिती अधिकारात आस्थापना विभागाकडून अधिकारी-कर्मचारी यांची माहिती घेऊन काही अर्जदार हे धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी दाखल करून दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून कारणे दाखवा नोटिसींपासून निलंबनाच्या कार्यवाहीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.
महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या दालनात सोमवारी यावर आयुक्त दिलीप ढोलेंसह काही अधिकाऱ्यांची तासभर बैठक झाली. तीत सतत माहिती अधिकाराचे अर्ज करून पैशांसाठी त्रास देणाऱ्यांची माहिती तयार करण्यावर चर्चा झडल्याचे सूत्रांनी सांगितले.