डोंबिवली/कल्याण : ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास महाराष्ट्र दिनापासून कचरा न उचलण्याची दमदाटी करणाºया, फौजदारी गुन्ह्याची भीती घालणाºया कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनावरच कचरा विल्हेवाट व व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता लोकांना धमक्या कसल्या देता आणि आपल्या अपयशाचे खापर लोकांच्या ‘बोडक्या’वर कशाला मारता, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.कचºयाचे वर्गीकरण न करणाºया आस्थापना व गृहनिर्माण सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. १ मे पासून कचरा उचलला जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेवर डोंबिवलीकरांनी तीव्र व तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.घनकचरा व्यवस्थापनाची नियमावली पालिका प्रशासनाने २००२ सालापासून अवलंबली नाही. प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने प्रशासनाचे अनेकदा कान उपटले. तसेच घनकचºयाची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील महापालिकेकडून प्रकल्प उभारण्याचे काम सुरूच आहे. कागदी घोडे नाचवले जात आहेत. लोकांवर नव्हे तर महापालिकेने प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केली म्हणून महापालिकेविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याकरिता वार्षिक १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली महापालिका नागरिकांना डस्टबिन देऊ शकत नाही का? त्यामुळे कचरा उचलला नाही तर नागरिकांनी ओला, सुका कचरा गोळा करून तो आयुक्तांच्या दालनातच टाकावा. तेव्हाच त्यांना नागरिकांच्या व्यथा समजतील.- सुहास तेलंग, नामांकित वकीलशहरातील रस्ते अरुंद आहेत. शहरात अतिक्रमणे आहेत. मोठ्या बसगाड्यांना रस्त्यावर वळण्यास जागा नाही. वाहतूककोंडी होत आहे. इतक्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. आधीच नागरी सुविधांकरिता पुरेशी जागा नाही. अशा परिस्थितीत सोसायट्यांनी ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्याकरिता जागा कुठून आणायची. खतनिर्मितीकरिता जागा तरी महापालिकेने उपलब्ध करून द्यावी. मगच असे उफराटे फतवे काढावे. कचरा वर्गीकरणास विरोध असण्याचे कारण नाही. कचरा वर्गीकरण करण्याच्या धमक्या दिल्याने ते केले जात नाही. कचºयापासून खत निर्माण करण्याचे प्रशिक्षण लोकांना प्रशासनाने दिले का? सक्तीने निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर तो होणार नाही. याचा गांभीर्याने विचार करायला हवा. हौसेने कुणी बागेत कचºयापासून खत तयार करत असेल. मात्र, सक्तीने ते करण्यास भाग पाडू नका.- प्रा.डॉ. उदयकुमार पाध्येकचरा वर्गीकरण करणे, ही कल्पना वाईट नाही. मात्र, हा निर्णय नागरिकांवर लादून चालणार नाही. त्याची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी नागरिकांना सवय लावणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सक्ती करता येईल. काल जाहीर केले आणि आज झाले, असे होत नाही. ही एक प्रक्रिया आहे. पण हेच महापालिका प्रशासनाच्या डोक्यात उतरलेले नाही. कारण त्यांच्या डोक्यात केवळ कचरा आहे. १ तारखेपासून कचरा उचलणार नाही, असे जाहीर करण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना देणाºया नोटिसा पाठवल्या आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही, असे आहे. चार दिवसांत दोन लाख मालमत्ता, ९० हजार आस्थापनांना नोटिसा कशा पाठवणार. त्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.- निलेश भणगे, प्लांट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअरसोसायटीचे प्रमुख
केडीएमसीवरच गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 3:16 AM