कल्याण : केडीएमसी प्रशासनामुळे कामे अडत असल्याने नगरसेवकांमध्ये असंतोष खदखदत असतानाच याविरोधात भाजपाचे नगरसेवक राहुल दामले यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. दामले यांच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या कालावधीत २०१८ मध्ये अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामांसाठी एक कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे ही कामे रखडत असल्याचा आरोप करत आठ दिवसांत कार्यवाही करण्याचा अल्टिमेटम दामले यांनी दिला आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच नगरसेवकांना आपल्या प्रभागामध्ये विकासकामे करण्यासाठी एक कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. मार्च २०१९ पर्यंत हा निधी खर्च करण्याची मुदत असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तो पडून आहे. अधिकारी वेगवेगळे निकष आणि त्रुटी दाखवून कामाच्या फाइल पुढे सरकू देत नसल्याने तरतुदीचा उद्देशच बाजूला पडला आहे. सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांनी ही कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत आयुक्तांना सूचना केल्यानंतरही फाइल मंजूर करण्यासाठी सदस्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. मंजुरीची निश्चित प्रक्रियाच सध्या महापालिकेत नाही. उलट, नामंजुरीचे खापर लोकप्रतिनिधींच्या माथी मारून अधिकारी हात झटकत आहेत. त्यामुळे माजी स्थायी समिती सभापती म्हणून ही कामे आठ दिवसांत मार्गी न लागल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दामले यांनी आयुक्तांना दिला आहे.आधी माहिती घ्या : आयुक्तआयुक्त बोडके यासंदर्भात म्हणाले की, एक कोटीच्या कामाच्या किती फाइल मंजूर झाल्या, याची दामले यांनी आधी नीट माहिती घ्यावी. एक कोटीच्या निधीतून गटारे, पायवाटांची कामे केली जाणार नाहीत, याबाबत यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. या निधीतून किती भरीव विकासकामे सदस्यांनी सुचवली आहेत, हे पाहा. माझ्या टेबलवर तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस फाइल पेंडन्सी नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.