- लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : नव्याने दिल्या जाणाऱ्या रिक्षांच्या परमिटमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याच्या ‘लोकमत’च्या ठाणे हॅलोमधील वृत्ताची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेत परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. रिक्षाच्या नव्या परमिटकरिता प्रत्येकी ५० हजार रुपये उकळले जात असल्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले. परिवहन विभागाने या संदर्भात लेखी आदेशपत्र काढले असून परमिटच्या फी व्यतिरिक्त कोणी जादा पैसे मागितले, अथवा घेतले असतील तर अशा अर्जदारांनी तातडीने अॅन्टीकरप्शन अथवा परिवहन विभागाला विभागाला माहिती द्यावी. परमिटकरिता पैसे स्वीकारणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. जे अर्जदार अशी प्रकरणे निदर्शनास आणतील त्यांना बक्षिस स्वरुपात ठोस रक्कम जरी देता आली नाही तरी त्यांच्या परमिटचे काम एका दिवसात करण्यात येईल, असे गेडाम यांनी जाहीर केले. अशी फिरली सूत्रे*मंगळवारी हॅलो ठाणेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची माहिती शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिली. रावते यांनी तत्काळ या प्रकरणाची माहिती घेण्याचे आदेश परिवहन आयुक्त डॉ. गेडाम यांना दिले. त्यानंतर परिवहन आयुक्तांच्या कार्यालयातून ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीला फोन आला, आणि वरील आदेश जारी झाले.मनसेसह भाजपानेही मानले आभारमनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम आणि भाजपाच्या रिक्षा युनियनचे खजिनदार दत्ता माळेकर यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. सर्वसामान्यांचे आर्थिक शोषण सुरु होते. त्याला या वृत्तामुळे वाचा फुटली. जनजागृती होण्यास मदत झाली. माळेकर यांनी सांगितले की, परिवहन मंत्र्यांना युनियनच्या माध्यमातून पत्र देण्यात येत आहे. डोंबिवलीतील एका रिक्षा चालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, मनसे जरी याप्रश्नी आवाज उठवत असली तरी मनसेचेही काही दलाल यात सामील असून त्यांनीही अनेकांचे अर्ज भरले आहेत. तसेच या बातमीमुळे कल्याण परिवहन कार्यालयात अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु असल्याचे चित्र असल्याचे सांगण्यात आले.
पैसे घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:49 AM