ठाणे महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या आधी ठाणेकरांना अनेक आश्वासने दिली होती परंतु त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण न केल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन आज ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नौपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिले.
निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी आश्वासने देतात खरी परंतु निवडणूक संपल्यानंतर मात्र त्याकडे सोयीस्करपणे काणाडोळा करतात. ठाणे महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील ठाणेकरांना तीस एकरमध्ये सेंट्रल पार्क, मुबलक पाणीपुरवठा साठी स्वतःचे धरण, ठाणे मुंबई नवी मुंबई ला जोडणारे जलवाहतूक अशी अनेक आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली परंतु त्यातील एकही आश्वासन त्यांनी आजतागायत पूर्ण केले नाही. त्यामुळे ही ठाणेकरांची झालेली फसवणूक असून यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारची फसवणूक करू नये यासाठी शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन नौपाडा पोलिसांना देण्यात आले. आपण या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी आपल्याला दिल्याचे ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.