उल्हासनगर : गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून ७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या तक्रारीवरून बांधकाम व्यावसायिक बलराम मूलचंदानी व भागीदार बीएजी एंटरप्राईज यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात बलराम मूलचंदानी व बीएजी एंटरप्राईज यांनी १९९४ ते ९६ दरम्यान विनापरवाना बेकायदा पाच मजल्याची साईशक्ती इमारत बांधून सदनिकांची विक्री केली. गेल्या महिन्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येऊन दुर्घटनाग्रस्त झालेल्या साईशक्ती व मोहिनी पॅलेस इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. मोहिनी पॅलेस इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी शुक्रवारी उल्हासनगर पोलीस ठाण्यात इमारतीचे विकासक मूलचंदानी व बीएजी एंटरप्राईजेस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.