मीरारोड - सदनिका विक्रीसाठी ५८ लाख रुपये घेऊन देखील तब्बल १० वर्षे होऊन सुद्धा इमारतच न बांधणाऱ्या दोघा विकासकां विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
भाईंदरच्या मॅक्सस मॉल शेजारी रसेश इमारतीत राहणारे पवनकुमार अग्रवाल यांनी २०१२ साली इस्टेट एजंट अजितच्या ओळखीतून राई गावात वालचंद कॉम्प्लेक्स मागील व्हि.आय.पी. रियेलेटर्स प्रा.लि. यांचे नव्याने बांधकाम सुरु असलेली जागा दाखवली होती . विकासकाचे व्यवस्थापक राजेश शुक्ला ने येथे व्हि.आय.पी. कॉम्प्लेक्स नावाने ७ मजल्यांच्या ४ इमारती बांधणार असल्याचे व २०१४ साली काम पूर्ण होईल असे सांगितले . ३ हजार रुपये प्रति चौ . फूट प्रमाणे दर ठरवून अग्रवाल यांनी स्वतःचे नावे २ , पत्नी मंजूचे नावे १ व मुलगा अमितच्या नावे ३ अश्या एकूण ६ सदनिका खरेदी करण्याचे ठरवून रोख व धनादेश द्वारे टप्या टप्प्याने ५७ लाख ८२ हजार रुपये इतकी रक्कम विकासकास दिली .
२०१४ उजाडले तरी इमारतीचे काम पाय पर्यंतच झाल्याने ओमप्रकाश व शुक्ला कडे वारंवार विचारणा केली . आपल्याला सदनिका मिळणार नाहीत असे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी २०१५ साला पासून दोघां कडे घेतलेले पैसे परत करण्याची मागणी सुरु केली . परंतु ओमप्रकाश व शुक्ल पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्याने २०१९ साली वकील मार्फत नोटीस पाठवली . विकासक ओमप्रकाशच्या मालाड सबवे , साईनाथ चाळीतील कार्यालयात अनेक वेळा खेपा मारल्या . परंतु विकासकाने मात्र माझ्याकडे पैसे आल्यानंतर परत करेन असे सांगू लागल्याने अखेर १८ डिसेम्बर २०२१ रोजी अग्रवाल यांच्या फिर्यादी नुसार ओमप्रकाश सिंग व राजेश शुक्ला विरुद्ध फसवणुकीसह मोफा कायद्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.