मीरा रोड : नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवले तसेच हुंड्यासाठी त्रास देत असल्याच्या नवविवाहितेच्या तक्रारीवरून मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी पतीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.मीरा रोडच्या नयानगर भागातील लक्ष्मीपार्कमध्ये राहणाऱ्या मोहंमद मूर्तजा सय्यद (२९) याचा एक महिन्यापूर्वी २७ वर्षीय तरुणीसोबत विवाह झाला होता. परंतु, लग्नानंतर पत्नीला समजले की, तिच्या पतीस टक्कल असून तो टक्कल लपवण्यासाठी केसांचा विग वापरत आहे. फसवणूक झाल्याने त्या दोघांचे वरचेवर खटके उडू लागले. मोहंमद हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि तिच्या मोबाइलवर त्याने पाळत ठेवली. त्यातच सासरची मंडळी हुंडा कमी दिला म्हणून त्रास देऊ लागली. या त्रासाला व फसवणुकीला कंटाळून महिलेने नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती व इतरांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
नवऱ्याने टक्कल लपवल्याने गुन्हा दाखल, नवविवाहितेची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 1:29 AM