मीरा रोड : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे भाऊ विनोद मेहता यांच्यावर सेव्हन इलेव्हन क्लब इमारती मागील कांदळवनचा ऱ्हास केल्याप्रकरणी महापालिकेने मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कनाकिया परिसरातील नवघर सर्व्हे क्र. ५१, ६८, ६९ पैकी जमिनीवर २००५च्या एमआरसॅक नकाशानुसार कांदळवनाची झाडे होती. या ठिकाणी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कांदळवनची झाडे नष्ट करून भराव केला व लॉन तयार केले, तसेच कुंपण भिंती, पाथवे, रस्ता आदी कामे केली. कांदळवन नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी गेल्या वर्षी पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल तयार केला होता.
महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मंजुरीनंतर प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी फिर्याद देऊन मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कंपनीचे मोठे भागधारक माजी आमदार मेहता आहेत, तर सातबारा नोंदी संचालक म्हणून विनोद मेहता आहे. कांदळवन नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी या आधीही मेहता, प्रशांत केळुस्कर, रजनीकांत सिंह आदींवर गुन्हे दाखल आहेत.