भिवंडी : मतदार यादीतील नावांबाबत हरकत घेण्यासाठी भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित भाजप महिला शहराध्यक्ष ममता परमाणी व भाजपपुरस्कृत अपक्ष नगरसेविका क्षमा ठाकूर यांचे पती मनोज ठाकूर हे दोघे समर्थकांसह हजर हाेते. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. याप्रकरणी परमाणी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मनोज ठाकूर व त्याचा भाऊ विनोद ठाकूर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना तत्काळ अटक करून परिसरातील दहशतीस आळा घालावा, अशी मागणी परमाणी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेउन केली आहे.
भिवंडी महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होत असून त्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक १६ मधील मतदार यादीमधील बोगस नावे कमी करण्यात आली आहेत. त्याबाबत हरकती घेण्यात येत असून मंगळवारी उपविभागीय कार्यालय परिसरातील भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक निंर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात राहुल सारंग यांच्या समोर सुनावणी आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी परमाणी व स्थानिक नगरसेविका ठाकूर यांचे पती हे समर्थकांसह हजर होते. त्यावेळी कार्यालयात गर्दी झाल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याने परमाणी व ठाकूर यांच्यात झटापट झाली. त्या या झटापटीत परमाणी यांच्या गळ्यातील साेन्याची चेन गहाळ झाली आहे. याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याचे परमाणी यांनी सांगितले. दरम्यान, मनोज ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.