मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील वरसावे येथील सरकारी तलाव माफियांनी चोरल्याच्या तक्रारींवर कारवाई केली जात नसल्याच्या मुद्यावर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर तलावचोरांनी पुन्हा तलाव खोदण्याचा खटाटोप केला. अखेर, याप्रकरणी महसूल विभागाने पर्यावरण संरक्षण कायद्यासह चोरी आणि अन्य कलमांखाली काशिमीरा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला. आश्चर्य म्हणजे, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्याच जबाबावरून हा गुन्हा एका व्यक्तीविरुद्ध दाखल केला आहे.वरसावे येथे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीचे सीएन रॉक हॉटेल आहे. हा परिसर वनहद्दीलगतचा इकोसेन्सेटिव्ह झोन असूनही येथे ७११ कंपनीने चक्क डोंगर फोडला. मोठमोठी झाडे नष्ट केली. नैसर्गिक पाणथळ व तलावांमध्ये भराव करून रस्ते, गटारे, पदपथ, कुंपण आदी पक्की बांधकामे केल्याच्या सततच्या तक्रारी असून, वन व महसूल विभागाकडून पाहणी होऊन अहवालही दिले गेले आहेत.एप्रिल २०१६ पासून आदिवासींसह श्रमजीवी संघटनेने त्यावेळी नरेंद्र मेहतांच्या नावानिशी सरकारी तलावात भराव केला जात असल्याच्या तक्रारी महसूल व महापालिकेकडे सातत्याने केल्या. परंतु, मेहतांच्या धास्तीने कारवाई झाली नाही. दुसरीकडे बेधडक भराव करून तलावच बुजवण्यात आला. भूखंड तयार करून सभोवताली कुंपण घालून लॉनही बनवण्यात आले.आदिवासी व श्रमजीवी संघटनेने केलेल्या सरकारी तलावचोरीच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याची बातमी लोकमतने दिल्यानंतर सरकारी यंत्रणेची धावपळ उडाली. दुसरीकडे स्वत: मेहतांनी मात्र तलाव चोरीला गेला नसून, उलट तो मोठा करून सुशोभीकरण केले आहे. मुळात तेथे तलावच नव्हता, असे सांगत विकास आराखड्यातदेखील तलाव नसल्याचा दावा केला होता. मात्र, रविवारची सरकारी सुटी साधून दिवसरात्र तलावाचे खोदकाम केल्याने या तलावचोरांचे पितळ उघडे पडले.दरम्यान, काशिमीरा पोलीस ठाण्यात तलाठी अभिजित बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी दीपक अनारेंसोबत पाहणी केली असता सी.एन. रॉक हॉटेलजवळ सरकारी तलाव दिसला नव्हता. सर्वत्र भराव केला होता. २० फेब्रुवारी रोजी भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी केली असता सर्व्हे क्र. ९० मध्ये नव्याने तलावाचे खोदकाम केलेले आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे हे उत्खनन सी.एन. रॉक हॉटेलच्या कुंपण भिंतीच्या आत झाले असल्याचे स्पष्ट झाले.हॉटेलचे व्यवस्थापक दीपक बासू यांना महसूल अधिकाऱ्यांनी तलाव खोदकामाबाबत विचारणा केली असता ते प्रभाकर उमाजी मगरे (४०), रा. जनकल्याण एसआरए, शांतीनगर, दहिसर याने केल्याचे बासू यांनी सांगितले. बासूंच्या सांगण्यावरून तलाठी यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात प्रभाकर यांच्याविरोधात फिर्याद दिली.सदर सरकारी जागेत बेकायदेशीररीत्या १९८ ब्रास गौणखनिजाचे उत्खनन केल्याने २० लाख ६८ हजार रुपयांचा दंडसुद्धा लावण्यात आला.>गुन्हा दाखल होईल याची धास्ती वाटल्याने ७११ कंपनीने दिवसरात्र खोदकाम करून तलाव जागेवर असल्याचे दाखवण्यासाठी खटाटोप केला. हे सर्व स्पष्ट असतानादेखील सी.एन. रॉक हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून केवळ खोदकाम करणाºया प्रभाकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मेहता व कंपनीस आरोपी केले नसल्याने माफियांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे.
सरकारी तलावचोरीप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 11:57 PM