मीरा रोड - विनापरवाना बनावट कीटकनाशक स्प्रे बनवण्याच्या कारखान्यातील गॅस गळती प्रकरणी अखेर गुरुवारी रात्री काशिमीरा पोलीस ठाण्यात जमीन मालक आणि चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्प्रेच्या बाटल्या, कीटकनाशक रसायने, यंत्र साहित्य आदी कारखान्यात असताना अग्नशिमन दलाने पंचनाम्यात केवळ गॅस सिलिंडरचाच उल्लेख केल्याने पोलिसांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तर राजकीय दबावामुळे यंत्र-साहित्य वगळल्याचे सूत्रांनी सांगितले.डाचकुल पाडा भागात सुरू असलेल्या बनावट कीटकनाशक स्प्रेच्या कारखान्याने त्यांचा जीव अस्वस्थ झाला होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळतीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते संतप्त झाले. स्थानिक नगरसेवक सचिन म्हात्रे यांना याबाबत कळवल्यानंतर म्हात्रेंनी घटनास्थळी धाव घेतली. घातक अशा बनावट किटकनाशक स्पे्रचा कारखाना पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने काशिमीरा पोलीस आणि अग्नीशमन दलास पाचारण केले. नागरिक संतापलेले पाहून तेथे काम करणाऱ्या कामगारांनी तेथून पळ काढला. जवानांनी गॅस सिलेंडरचा स्प्रे भरण्यासाठीचा चालवलेला पुरवठा खंडीत करुन गॅस गळती थांबवली. घटनास्थळी भारत गॅसचे २४ गॅस सिलेंडर, स्प्रेच्या ४०० रिकाम्या बाटल्या, हिट, आॅल आऊट आदी नावं असलेल्या जुन्या भरलेल्या तसेच रिकाम्या बाटल्या, तीन बॅरल भरून असलेले केमीकल, स्प्रे भरण्यासाठीची यंत्र सामुग्री आदीची नोंद करण्यात आली. त्या नंतर वीज पुरवठा बंद करुन कारखान्यास टाळे ठोकले.पुन्हा दुपारी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी गेले. तेथील सिलेंडरचा साठा जप्त केला. पण स्प्रे भरलेल्या बाटल्या उन्हात नेल्या असता फुटत असल्याचे सांगून त्या आतच ठेवल्या. नगरसेवक म्हात्रे हे दुपारी आले होते. वरिष्ठांची मंजुरी घेऊन बुधवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचे प्रभारी मुख्य अग्नशिमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले होते. पण गुरुवारी मंजुरी मिळाल्या नंतर अग्निशमन केंद्र अधिकारी डोसन ढोल्या यांनी सायंकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यात गफूर शेख हे नाव होते.फिर्यादीत २४ गॅस सिलिंडरचा उल्लेख असल्याने पोलिसांनी पालिकेच्या या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या फिर्यादीनंतर जमीन मालक मोहम्मद अझरुद्दीन सिद्दीकी रा. मुंबई व कारखाना चालक सालेहा मोहम्मद अब्दुल कादर शेख रा. मालाड यांच्यावर गुन्हा दाखल केला.कारखान्याचे बांधकाम बेकायदाराजकीय दबावानंतर कारखान्यातील सापडलेली यंत्र सामुग्री, स्प्रेच्या जुन्या आणि नव्या बाटल्या, केमिकल आदींचा साठा वगळण्यात आल्याचे सूत्र म्हणाले. वास्तविक, या कारखान्याचे बांधकामच बेकायदा असून त्याच्याकडे कोणतेही परवाने नसताना तो बनावट स्प्रे बनवत होता. या कारखान्यामध्ये स्फोट झाला असता किंवा अन्य कोणती दुर्घटना घडली असती तर ते परिसरातील रहिवाशांच्या जीवावर बेतणारेठरले असते.
बनावट कीटकनाशक स्प्रे कारखाना, चालक- मालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:55 AM