मीरा रोड : पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी बोलावलेल्या गैरअर्जदाराने अधिकाऱ्यांच्या दालनात छायाचित्रे काढली व तक्रार अर्जाचे छायाचित्रण केले म्हणून पोलिसांनी हेरगिरीचा ठपका ठेवत शासकीय गुपिते अधिनियमाखाली एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
मीरा रोड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी त्यांच्याकडे वरिष्ठ कार्यालयाकडून आलेला तक्रार अर्जाच्या चौकशीकामी २० एप्रिल रोजी सायंकाळी गैरअर्जदार झिशान मुख्तार हुसेन सिद्दिकी (३४) रा. पुनम सृष्टी, लतीफ पार्क, मीरा रोड यांना बोलावले होते. चव्हाण हे झिशान याचा जबाब नोंदवित असताना त्याने तक्रार अर्ज वाचण्यासाठी मागितला. त्याप्रमाणे अर्जाचे स्वरूप समजण्याकरिता तो अर्ज झिशानला वाचण्याकरिता दिला.
त्यावेळी त्याने तक्रारी अर्जाची छायांकित प्रत अथवा त्याचा मोबाईलमध्ये फोटो घेण्याची मागणी केली. परंतु अर्जाची चौकशी चालू असल्याने तो देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत त्याला कायदेशीर बाब समजावून सांगितली. मात्र जबाब नोंदवित असताना चव्हाण व पोलीस हवालदार संजय उत्तेकर यांची नजर चुकवून झिशान याने मोबाईलमध्ये अर्जाचे फोटो व व्हिडिओ काढले.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मोबाईलची पडताळणी करण्याची मागणी केली असता झिशान याने काही मोबाईलमधील छायाचित्र आदी डिलिट करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मोबाईल घेईपर्यंत त्याने ५ छायाचित्रे डिलिट केली होती. परंतु पोलिसांनी मोबाईल घेतल्यानंतर त्यात चव्हाण यांच्या दालनातील कार्पेट टेबलचे ४ फोटो व तक्रारी अर्ज चित्रीकरणाच्या ३ व्हिडिओ क्लिप सापडल्या. पोलिसांनी झिशानचा मोबाईल ताब्यात घेतला व त्याने शासकीय गुपिते अधिनियमाचा भंग करून शासकीय कामाची गोपनियता भंग करून हेरगिरी केली म्हणून पोलिसांतर्फे उत्तेकर यांनी बुधवारी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.