कल्याण : शहरातील कचराकोंडी दूर करण्याला प्राधान्य देत कचरा गोळा करण्यापासून त्याच्या विल्हेवाटीवर भर देणारा आणि त्याच वेळी ही शहरे स्मार्ट होतील, हे गृहीत धरून त्यांच्या विकासासाठी वाढीव निधीची तरतूद करणारा कल्याण-डोंबिवली महापालिकेचा २०१६-१७ चा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी सोमवारी महासभेत सादर केला. त्यात, एक हजार ९५६ कोटी ४४ लाख रुपये जमेची बाजू, तर एक हजार ९५६ कोटी २७ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. १६ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे.कशावर केला जाणार खर्चशहरात सध्या २४ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या १७४ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांव्यतिरिक्त १०० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यातून, १४४ रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. कल्याणमधील तेलवणे रुग्णालयानजीक पादचारी पुलासाठी ६० कोटींची तरतूद केली आहे. कल्याणचा राज्य परिवहन महामंडळाचा बस डेपो खडकपाडा येथे स्थलांतरित करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्यासाठी वॉर्डन नियुक्त केले जातील. त्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद केली. पथदिव्यांसाठी १७ कोटी ११ लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात, भरावभूमी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. ओल्या कचऱ्याची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यासाठी अडीच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी दोन कोटी व कचरा करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक स्थापन करण्यासाठी १५ लाख रुपये आणि कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या खरेदीसाठी २ कोटी ४३ लाखांची तरतूद आहे. जल व मलनि:सारणासाठी ४५ कोटी ५० लाख रुपये, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी १० लाखांचा निधी दिला जाईल. वैद्यकीय महाविद्यालयासाठी दीड कोटी आणि महापालिका रुग्णालये औषधपुरवठ्यासाठी सात कोटी ७३ लाख रुपये ठेवले आहेत. अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणासाठी पाच कोटींची तरतूद आहे. सार्वजनिक शिक्षणासाठी १२ कोटी ६३ लाख, उद्याने व क्रीडांगणे विकसित करण्यासाठी चार कोटी २० लाख, तलावांच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ७० लाख रुपये तरतूद केली आहे. बहुउद्देशी सभागृहासाठी पाच कोटी रुपये आणि स्मशानभूमीसाठी सात कोटी ४५ लाख रुपये, भाजी मंडई व मच्छी मार्केटसाठी चार कोटी ४० लाख, ई-गव्हर्नन्ससाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीसाठी कॉल सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद आहे. स्मार्ट सिटीसाठी २५० कोटी स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या यादीत शहराची निवड झाली नसली तरी एप्रिलमध्ये दुसऱ्या यादीत शहराचा समावेश स्मार्ट सिटीत होऊ शकतो. भविष्यात निवड झाल्यास त्यासाठी तरतूद हवी. या हेतूने स्वत:चा निधी म्हणून महापालिकेने ५० कोटींसह २०० कोटींची तरतूद केली आहे. अमृत योजनेसाठी १० कोटी, पंतप्रधान योजनेसाठी १० कोटींची तरतूद आणि बीएसयूपी योजनेसाठी १६२ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. दलित वस्ती श्रमसाफल्य योजनेसाठी १६ कोटी आणि स्वच्छ भारत व सुजल निर्मल अभियानासाठी ११ कोटी ८१ लाखांची तरतूद केली आहे. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ लाखांची तरतूद आहे. महिलांना ई-टॉयलेट देण्यासाठी एक कोटी व डायलेसिस सेंटर जोपर्यंत महापालिका उभारत नाही, तोपर्यंत त्या रुग्णांचा खर्च महापालिका देईल. त्यासाठी, एक कोटी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. अंधअपंगांच्या पुनर्वसनासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये आणि परिवहन उपक्रमासाठी ३२ कोटी ठेवले आहेत.२७ गावांसाठीही भरीव तरतूद२७ गावांतील रस्ते विकासासाठी ६४ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी २० कोटी, दिवाबत्तीसाठी १ कोटी ३० लाख, नवीन नाल्यांसाठी १० कोटी, पाणीपुरवठ्यासाठी २० कोटी, तलाव-उद्यानांसाठी एक कोटी ५ लाख, स्मशानभूमीसाठी दोन कोटी ५० लाख, भांडवली कामांसाठी ८६ कोटी आणि मलनि:सारण सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी दोन कोटी १० लाखांची स्वतंत्र तरतूद केली आहे.यंदाचा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी आहे. त्यात आरोग्य, रस्ते, पाणी, इतर अत्याधुनिक सेवासुविधांवर भर आहे. शहारातील विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे.- संदीप गायकर, सभापती, स्थायी समिती
कचऱ्याच्या विल्हेवाटीवर भर
By admin | Published: March 15, 2016 1:15 AM