मीरारोड - मेडिक्लेमची मंजुरी आलेली नसल्याने बिलाची रक्कम भरा अन्यथा मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न देण्याचा पवित्रा मीरा रोडच्या तुंगा रुग्णालयात घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यानंतर पावणे नऊच्या सुमारास मृतदेह ताब्यात देण्यात आला.मीरा रोडला राहणा-या ५८ वर्षीय मंजू बलसारा यांना अस्वस्थ वाटत असल्याने १४ फेब्रुवारी रोजी तुंगा रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. मंजू यांचा मुलगा केतन यांनी सांगितले की, माझी आई रुग्णालयात चालत गेली होती. तिचे ३ लाखांपर्यंत मेडिक्लेम होते. रुग्णालयात डॉक्टरने आईला भरती करण्यास सांगितले. नंतर चार दिवस ती अतिदक्षता ( आयसीयू ) विभागात होती. व्हेंटिलेटरवर तिला ठेवण्यात आले. डॉक्टरांनी एक शस्त्रक्रिया करण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे सोमवारी शस्त्रक्रिया पण केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे रुग्णालयाने सांगत तिला आणखी दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल, असे सांगितले.तोच आज बुधवारी पहाटे चारच्या सुमारास रुग्णालयातून फोन आला असता आम्ही तडक तेथे पोहोचलो. तेथे तिला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यात तिचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात मागितला असता तो देण्यास सरळ नकार देण्यात आला. २ लाख ४१ हजार रुपये इतकं बिल झालं असून, तुमच्या मेडिक्लेम मंजुरीची कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याचे कारण सांगण्यात आले. मेडिक्लेम कंपनीकडून जेव्हा आम्हाला बिलं मंजुरीचे कळवले जाईल तेव्हाच मृतदेह ताब्यात देता येईल अन्यथा बिलाची सर्व रक्कम आता भरा, असं सांगण्यात आलं. यामुळे संतप्त झालेल्या नातलगांनी हा अडवणुकीचा प्रकार नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांना कळवला. खंडेलवाल यांनी रुग्णालयात धाव घेत तेथे जबाबदार डॉक्टर वा कर्मचारी याबाबत विचारणा केली असता त्यांना कोणीच उत्तर देत नसल्याने थेट नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंह यांना कळवले. भालसिंह यांनी तणाव वाढू नये म्हणून लगेच पोलीस रुग्णालयात पाठवले. दरम्यान स्थायी समितीचे सभापती ध्रुवकिशोर पाटील देखील तेथे पोहोचले.खंडेलवाल, पाटील यांनी तेथे उपस्थित रुग्णालयाच्या प्रतिनिधींना मेडिक्लेम मंजूर करण्याची प्रक्रिया तुम्ही बघायची आहे. कोणत्या नियमात तुम्ही मृतदेह नातलगांना देत नाही ते लेखी द्या, असे ठणकावले. जवळ पास चार तासा नंतर म्हणजे सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास रुग्णालयाने मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. डॉ. सतीश शेट्टी ( तुंगा रुग्णालयाचे संचालक ) - मेडिक्लेम किंवा पैसे बाकी म्हणून मृतदेह दिला नाही हे साफ चुकीचे आहे. आम्ही सामाजिक भावानेने नेहमी काम करतो. पहाटे साडे पाच वा. निधन झालं. मृत व्यक्तीला दिला जाणारा मृत्यूचा दाखला, रुग्णाची माहिती मेडिक्लेम संबंधितना कळवणे आदी प्रक्रिया असते. ती पुर्ण करुन साडे सात वाजताच मृतदेह त्यांच्या नातलगांच्या ताब्यात दिला आहे.सुरेश खंडेलवाल ( नगरसेवक ) - मेडिक्लेमची मंजुरी नाही म्हणुन पैसे भरा. त्या शिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही हा तुंगा रुग्णालयाचा प्रकार निंदनिय आहे. नागरीकांना असा आडमुठेपणा करुन त्यांच्या दुख:द प्रसंगी वेठीस धरणे चुकीचे आहे. या विरोधात कार्यवाही करण्याची मागणी आपण करणार.
पैसे भरा अन्यथा मृतदेह ताब्यात देणार नाही, रुग्णालयाचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 10:52 PM