भिवंडी / पडघा : मुंबई-नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा यामुळे गुरुवारी सर्वपक्षीय स्थानिक आंदोलकांनी पडघा टोलनाक्यावरील टोलवसुली बंद पाडली होती. टोलनाका पूर्ववत सुरू व्हावा याकरिता शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलनाका प्रशासनाने पडघा टाेलनाका कार्यालयात स्थानिक आंदोलकांची एक बैठक बोलावली होती. त्यात टोलनाका तत्काळ सुरू करण्यासंदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्याने पुढील तीन ते चार दिवस पडघा टोलनाका बंदच राहणार आहे.
भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बाळासाहेब साळुंखे, एमएलएन कंपनीचे व्यवस्थापक गिरीश कामत, पिक इन्फ्रास्ट्रक्चर या टोलवसुली कंपनीचे व्यवस्थापक बाबूभाई शेख, पोलीस निरीक्षक दिनेश कटके आदी सहभागी होते. अगोदर खड्डे बुजवा, मगच खोल नाका सुरू करा या आपल्या मागणीवर डॉ. संजय पाटील, माजी सभापती प्रकाश भोईर, भगवान सांबरे, रवींद्र विशे, शैलेश बिडवी, शशिकांत गोतारणे, मुशिर नाचन, श्रीकांत गायकर, अशोक शेरेकर, पडद्याचे सरपंच अमोल बिडवी, उपसरपंच अभिषेक नागावेकर, रिक्षा युनियनचे अशोक पाटील, विकास थेटे आदी आंदोलक ठाम राहिले.
आंदोलक असमाधानीखड्डे बुजवण्याकरिता तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे बाबूभाई शेख यांच्याकडून सांगण्यात आले. आंदोलकांचे यात समाधान न झाल्याने पुढील तीन-चार दिवसांअगोदर खड्डे भरा, मगच टोलनाका सुरू करा, असे सांगण्यात आले. अखेर टोलनाका प्रशासनाला आंदोलकांची ही मागणी मागणी मान्य करावी लागली. यामुळे पुढील खड्डे बुजविण्यापर्यंत लागणाऱ्या तीन-चार दिवस कालावधीनंतरच पडघा टोल नाका सुरू होणार आहे. तसेच महामार्गावरील प्रलंबित कामेही पूर्ण करण्याचे आश्वासन टोलनाका प्रशासनाने आंदोलकांना दिले आहे.