ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे आतापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची सोमवारी भेट घेऊन संताप व्यक्त केला. झोपलेल्या व्यक्तीला उठवता येते पण, झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही, असे सांगत मनसेने यावेळी सोनाग्रा यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातील एमएमआरडीएच्या अखत्यारीत असलेल्या कोपरी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याठिकाणी चार दिवसांपूर्वी खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा आगसन रस्त्यावरही दुचाकी घसरून पडली. त्याचवेळी टँकरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यामुळे संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोनाग्रा यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
खड्ड्यामुळे कोपरी येथे झालेल्या अपघाताबाबत नगर अभियंत्यांना माहितीच नसून त्याचबरोबर शहरात कुठे खड्डे आहेत, याबाबतही त्यांना माहीत नाही, असा आरोप मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला. झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही, असे सांगत मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर अभियंता सोनाग्रा यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली. तसेच गणेशोत्सवाच्या काळात वातावरण बिघडू नये, म्हणून आम्ही शांत आहोत. ठाण्यातील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोपरी पुलाचा रस्ता एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो. संबंधितांना खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच इतर प्राधिकरणालाही खड्डे बुजविण्याच्या सूचना देण्यात येतात. दिवा आगासन भागात १६०० मीटर काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. जमीन वादामुळे ४०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहेत. याच भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. असे अपघात होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे निरंतर सुरू आहेत. प्रशांत सोनाग्रा,नगर अभियंता, ठाणे महापालिका.