डोंबिवली : रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि पाऊस यामुळे केडीएमसीच्या खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळा येत असताना मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी काही मार्गांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मनपाची लगबग दिसून आली. मात्र खडी आणि वाळूच्या मिश्रणातून तात्पुरती केलेली डागडुजी कितपत तग धरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांची पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांनी पुरती चाळण केली आहे. महापालिका क्षेत्रासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागत आहे. वाहनचालकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. डांबरी रस्त्यांची वाताहत झाली असताना काँक्रिटीकरणाच्या कामांचाही बोजवारा उडाला आहे. या रस्त्यांची पातळी समान न राहिल्याने हे चढउतार त्रासदायक ठरत आहेत. जागोजागी टाकण्यात आलेले पेव्हर ब्लॉकही उखडले असून, त्याची जागा खड्ड्यांनी घेतल्याने काँक्रिटच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना जिकिरीचे होऊन बसले आहे. पावसामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळा येत असल्याचे मनपाचे अधिकारी सांगत होते. परंतु मंगळवारी पालकमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी काही रस्त्यांवर डागडुजीची कामे लगबगीने सुरू असल्याचे दिसून आले.
केडीएमसी सरसावली
- टाटानाका ते घरडा सर्कल हा खंबाळपाडा मार्ग केडीएमसीच्या हद्दीत येत असला तरी या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. परंतु त्या ठिकाणचे खड्डेही केडीएमसीच्या वतीने तातडीने बुजविण्यात आले.
- ज्या ठिकाणी विकासकामांच्या लोकार्पणासाठी शिंदे जाणार होते त्या मार्गावरील खड्डेही बुजविण्यात आले. यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी, मनपाची पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधी खड्डे बुजविण्यासाठी सुरू असलेली लगबग चर्चेचा विषय ठरली आहे.
---------------------------