ठाणे : स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांच्या २०२० मध्ये परीक्षा हाेउन निकालही जाहीर झाले. मात्र या परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रच मिळाले नव्हते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर दीड वर्षानंतर या १९६ विद्यार्थ्याना युक्तीपत्रे प्राप्त करून देण्यात यश मिळाले, असे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दावा केला आहे.
नियुक्तीपत्र मिळाले नसल्यामुळे या भावी अभियंता उमेदवारांनी डावखरे यांची भेट घेऊन व्यथा सांगितली होती. त्यानंतर चव्हाण यांची भेट घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नियुक्तीपत्र व कामाचे ठिकाण प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार चव्हाण यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन उमेदवारांना महिनाभरात नियुक्ती मिळवून दिली. या निर्णयाबद्दल नवनियुक्त उमेदवारांनी डावखरे यांच्यासमवेत चव्हाण यांची भेट घेऊन आभार मानले.