महापालिकेतील अंतर्गत निवडणुकांना अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:28 AM2019-05-03T00:28:02+5:302019-05-03T00:28:24+5:30
शिक्षण समिती सदस्य निवड : ९ मे रोजी विशेष महासभा
कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे केडीएमसीतील रखडलेल्या अंतर्गत निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. शिक्षण समिती सदस्यांची निवड केली जाणार असून नवीन समिती नेमण्यासाठी ९ मे रोजी दुपारी विशेष महासभा बोलावली आहे. यंदाचे सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे या समितीवर वर्णी लागण्यासाठी सेनेतील अनेक नगरसेवक इच्छुक असल्याचे बोलले जाते.
शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर शिक्षण समिती स्थापन करण्यात आली. शिक्षण मंडळावर सदस्य नेमताना बाहेरील व्यक्तींना प्राधान्य दिले जात होते. परंतु, आता तौलनिक संख्याबळाच्या प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार नगरसेवकांचीच या ११ सदस्यांच्या समितीवर वर्णी लावली जात आहे. शिक्षण मंडळाला पाच वर्षे मिळत होते. परंतु, शिक्षण समितीसाठी एक वर्षाचाच कालावधी आहे.
गेल्या वर्षी १९ मार्चला झालेल्या महासभेत शिक्षण समितीचे नवीन सदस्य नियुक्त करण्यात आले होते. यात शिवसेना पाच, भाजपा चार, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी एक, अशा ११ सदस्यांची निवड करण्यात आली. यात शिवसेनेच्या सुशीला माळी, हर्षाली थवील, संगीता पाटील, वैजयंती गुजर-घोलप आणि प्रेमा म्हात्रे यांना, तर मनसेच्या अपेक्षा जाधव, काँग्रेसच्या दर्शना शेलार, भाजपचे विश्वदीप पवार, साई शेलार, विनोद काळण, गणेश भाने यांना संधी मिळाली होती. मात्र, घोलप यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्यांच्या जागी शिवसेनेच्या नगरसेविका नमिता पाटील यांची निवड झाली होती. त्यावेळी १३ एप्रिलला सभापतीपदाची निवडणूक झाली होती. यंदाही मार्चमध्ये शिक्षण समितीची मुदत संपुष्टात आली. परंतु, आचारसंहितेमुळे सदस्य आणि सभापतीपदाची निवड या प्रक्रिया पूर्णत: रखडल्या होत्या.