उल्हासनगर : येथील नागरिक मालमत्ता कर भरत नसल्याने पालिकेचे नुकसान होत आहे. यामुळे पालिकेने अखेर अभय योजना जाहीर केली. योजना दोन टप्प्यात असून, १८ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना ८० टक्के, तर ८ ते ३१ मार्चदरम्यान कर भरणाऱ्यांना ५० टक्के व्याज माफ होणार आहे. नागरिकांनी अभय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले आहे.
उल्हासनगरातील नागरिकांना कोरोना काळात दिलासा देण्यासाठी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भालेराव यांनी पुढाकार घेऊन मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लावण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. बुधवारी महासभा सुरू होण्यापूर्वी महापौर, उपमहापौर, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन टप्प्यातील अभय योजना जाहीर केली. ३१ मार्चअखेर वसुलीचे १०० कोटींचे लक्ष्य ठेवल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. मालमत्ता कर विभागाची एकूण थकबाकी ५२० कोटींपेक्षा जास्त असून, १ लाख ७७ हजार एकूण मालमत्ताधारक आहेत. कोरोना काळात मालमत्ता कर वसुली कमी झाली असली, तरी मार्च महिन्याअखेर लक्ष्य गाठू, असा विश्वास व्यक्त केला.
कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महासभेत प्रस्ताव आणला होता. मालमत्ता कर विभागाचे कर निर्धारक संचालक जेठानंद करमचंदानी म्हणाले की, जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी जनजागृती केेली जाणार आहे. तसेच एका खासगी कंपनीकडून मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू आहे.
चौकट
कंपनीला सहापैकी दोन दिले
महापालिकेने शहरातील मालमत्तेचे पुनसर्वेक्षण करण्याचे कंत्राट क्लोर्बो नावाच्या कंपनीला दिले आहे. मालमत्ता सर्वेक्षणानंतर उत्पन्नात दुप्पट वाढ होईल, असे अरुण अशान यांनी सांगितले. मार्चनंतर मालमत्ता सर्वेक्षणावर महापालिका भर देणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणापोटी कंपनीला सहा कोटींपैकी दोन कोटी सहा लाख दिल्याचे बोलले जात आहे.