- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या असहकाराविरोधात १९ जानेवारीपासून आपापली दालने कुलूपबंद केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीते यांची बदली केल्यानंतर अखेर ती बंद दालने सत्ताधा-यांनी सोमवारी खुली केली.तत्कालीन आयुक्त सत्ताधाऱ्यांना जुमानत नसल्याने महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृह नेता रोहिदास पाटील व सहा प्रभाग सभापतींनी स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार १९ जानेवारीपासून आपापल्या दालनांना सील ठोकून ती परस्पर बंद केली. यामुळे नागरिकांचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांशी थेट संपर्क तुटला होता. कुलूपबंद दालनातील कर्मचारी देखील यामुळे कामाविना ठरले होते. भाजपाच्या या दबावतंत्राविरोधात शिवसेनेसह काँग्रेसने आंदोलन छेडून परस्पर पालिकेच्या वास्तूंतील दालने बंद केल्याने सत्ताधाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.परंतु प्रशासनाने सत्ताधा-यांवर कारवाई करण्याचे धाडस न दाखविता सेना-काँग्रेस या विरोधी पक्षांनी विरोधी पक्षनेत्यांचे दालन परस्पर खुले केले होते, ते मात्र त्वरित सील करण्याचे धाडस केले. सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या असहकाराचा पाढा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना कार्यवाहीचे संकेत दिल्यानंतर आयुक्तांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत मिळाले होते. अखेर राज्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी ५ फेब्रुवारीला चर्चा करून आयुक्तांच्या बदलीचा आदेश काढला. यात सत्ताधारी भाजपाचा प्रामुख्याने आ. नरेंद्र मेहता यांचा विजय झाल्याने त्यांच्या निर्देशानुसार बंद झालेली दालने खुली होण्याची चिन्हे निर्माण झाली. परंतु सत्ताधाऱ्यांनी नवीन आयुक्तांच्या पदभार स्वीकारण्याची प्रतीक्षा करून दालने बंदच ठेवणे पसंत केले.अखेर नव्याने आयुक्तपदावर नियुक्ती झालेल्या बी. जी. पवार यांनी ९ फेब्रुवारीला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत सत्ताधाऱ्यांची बैठक पार पाडण्यात आली. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आपल्या कामांना प्राधान्य देण्याची अट आयुक्तांना घातली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी प्रशासन, सत्ताधा-यांसोबत सामंजस्याने कारभार करेल, असा आशावाद सत्ताधा-यांसाठी निर्माण केला. यावर समाधान झालेल्या सत्ताधाऱ्यांनी अखेर सोमवारी दालने खुली करण्याचा मुहूर्त निश्चित केला. त्यानुसार सत्ताधाऱ्यांतील पदसिद्ध अधिकाऱ्यांनी गेल्या २४ दिवसांपासून बंद असलेली आपापली दालने सोमवारी पुन्हा खुली करुन आपापला कारभार सुरू केला. यावेळी आ. मेहता यांनी देखील महापौर दालनात नेहमीप्रमाणे हजेरी लावल्याने नागरीकांनी त्या-त्या दालनात गर्दी केली होती.
अखेर आयुक्तांच्या बदलीनंतर सत्ताधाऱ्यांनी बंद केलेली दालने केली खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 11:58 PM