लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दहिसर गावातील एक्सीस बँकेच्या अॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची तोडफोड करुन १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडची चोरी करणा-या आठ जणांच्या टोळीपैकी उत्तरप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या भीमा बहाद्दूर जोरा यालाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. त्याच्याकडून ५५ हजारांची रोकड आणि दोन मोबाईल हस्तगत केले असून आतापर्यंत या चोरीतील आठ लाख ४३ हजार ९०० इतकी रोकड हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.जोरा हा नेपाळमध्ये पळून जाण्याच्या बेतात असतांनाच उत्तरप्रदेशातील कानपूर येथून उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. १२ जून रोजी त्याला ताब्यात युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, पोलीस नाईक विक्रांत कांबळे आणि दादा पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि एटीएम चोरीतील ५५ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्याला १४ जून रोजी एटीएम चोरीच्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. याच प्रकरणात त्याला १५ जून रोजी ठाणे न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे तालुक्यातील दहिसर ग्रामपंचायतीजवळील अॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रातील एटीएम संचाची मोडतोड करुन त्यातील १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह ८ जून रोजी चोरण्यात आले होते. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या दोन वेगवेगळया पथकांनी उल्हासनगर, अंबरनाथ आणि थेट उत्तरप्रदेशात जाऊन आतापर्यंत सहा जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांनी उल्हासनगरातून अटक रफिकरौफ सय्यद याला अटक केली. आतापर्यंत सुरेश म्हात्रे याच्यासह चौघा जणांकडून सहा लाख ७१ हजार ९००, रफिकरौफ याच्याकडून एक लाख १७ हजार रुपये तर जोराकडून ५५ हजार अशी आठ लाख ४३ हजार ९०० ची रोकड हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.