राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेचे एकमेव रेंगाळलेले क्रीडा संकुल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासनाने अखेर कंत्राटदाराची नियुक्ती केली असून, ते एका आठवड्यात स्थानिक क्रीडापटूंसाठी खुले केले जाणार असल्याचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी लोकमतला सांगितले.२०१४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण केलेले पालिकेचे एकमेव क्रीडा संकुल सततच्या तांत्रिक अडचणीत सापडल्याने ते स्थानिक खेळाडूंसाठी अद्याप पूर्णपणे खुले होऊ शकलेले नाही. समाजसेवक व लोकप्रतिनिधींच्या आंदोलनानंतर गेल्या मार्च महिन्यात त्यातील कॅरम, बुद्धिबळासारखे इनडोअर खेळ प्रशासनाने सुरू केले. ते पूर्णपणे सुरू करण्यासाठी मात्र धोरण निश्चित होत नसल्याने स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यातील अपूर्ण कामे एप्रिलमध्ये पूर्ण करण्यास प्रशासनाने सुरुवात केली.दरम्यान त्याच्या धोरणांचा तिढा सुटल्यानंतरही त्याच्या निविदाप्रक्रियेला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे रेटण्यात येऊ लागले. तरीदेखील ते गेल्या एप्रिलमध्येच स्थानिक क्रीडापटूंसाठी खुले करण्याचा राजकीय निर्धार करण्यात आला. मात्र त्यात राजकीय श्रेयवादाचा शिरकाव होऊन हे क्रीडा संकुल आमच्याच प्रभागात येत असल्याने त्याच्या उद्घाटनाचा अधिकार आमचाच असल्याचा दावा सेनेच्या नगरसेवकांकडून सुरू झाला. भाजपाने देखील सेनेच्या या हट्टाला काटशह देण्यासाठी त्याचे उद्घाटन स्वपक्षातील नेत्यांमार्फत उरकण्याचा घाट घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते कोणाच्या प्रयत्नाने सुरू झाले, त्याची जाहिरात करण्याचा खेळ मात्र सुरू झाला.या श्रेय लाटण्याच्या हट्टापायी अखेर दोन्ही पक्षांनी आमनेसामने लढले. त्यांनी क्रीडा संकुल सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. यामुळे त्याचे उद्घाटन राजकीय श्रेयवादामुळे तब्बल तीन वेळा होण्याची सार्वजनिक वास्तूची ही पहिलीच वेळ ठरली. या श्रेयवादात क्रीडा संकुलाचा मुहूर्त मात्र लटकत राहिला. अखेर ते रॉयल्टीच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या. यात पालिकेचा एकही पैसा खर्च न होता क्रीडा संकुल चालविणा-या कंत्राटदाराकडून पालिकेलाच रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे. त्याला चार निविदाकारांनी प्रतिसाद दिल्यानंतर त्यातील जास्त रॉयल्टी देणाऱ्या चॅम्पियन फाऊंडेशन या क्रीडेसंबंधी संस्थेची निविदा वर्षाकाठी २५ लाख २६ हजार सर्वात जास्त रॉयल्टी देणारी ठरली. त्याला ८ जूनच्या स्थायी समितीने मान्यता दिली.परंतु गेल्या चार महिन्यांपासून कंत्राटदार नियुक्तीचा करारनामा प्रशासकीय लालफितीत अडकल्याने क्रीडा संकुल सुरू होऊ शकले नाही. यामुळे स्थानिक खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी पसरली असतानाच आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी पालिका व कंत्राटदार दरम्यानच्या करारनाम्याला नुकतीच अंतिम मान्यता दिली. त्यामुळे क्रीडा संकुल सुरू करण्यासाठी ते कंत्राटदाराच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे उपायुक्तांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले की, पालिकेच्या क्रीडा संकुलातील तरणतलाव स्वच्छ केला जात असून त्यातील पाणी निर्जंतुक होण्यासाठी क्लोरोनेशन प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच संकुलातील इतर क्रीडा प्रकारही सुरू होण्याच्या मार्गावर असून केवळ जिमन्यॅशियम सुरू करण्याची निविदा प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. तीसुद्धा लवकरच पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने क्रीडापटूंसाठी खुले केले जाणार आहे.
अखेर एकमेव क्रीडा संकुलाला सुरू करण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 4:01 PM