अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘माझ्या मनास आता मृत्यूचे भय नाही... मृत्यूच पाहिला मी, मृत्यूच जाळला मी...’ अशी भावना आपल्या कवितेतून व्यक्त करणारे ठाण्यातील कवीमनाचे पी. विश्वानाथ. त्यांचा संसार एक महिन्यापासून उघड्यावर आला. महिनाभरापासून घराच्या शोधात भटकणाऱ्या या कवीला अखेर महापौर आणि पालिका प्रशासनाने डोक्यावर छप्पर दिले आहे! ठाण्याच्या चंदनवाडी भागात हे दामप्त्य वास्तव्यास होते. आज पी. विश्वनाथ अर्थात विश्वनाथ मुरुडकर यांचे वय ७७ असून, त्यांच्या पत्नी राजेश्री यांचे वय ७३ च्या आसपास आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला एकामागून एक असे दोन धक्के बसले. त्यांची दोनही मुले लहानपणीच दगावली. या धक्क्यातून सावरत विश्वनाथ यांनी पत्नीला बालवाडीचे प्रशिक्षण घेण्यास सांगितले. चंदनवाडी भागात बालवाडी वर्ग सुरू केले. परंतु विश्वनाथ यांच्या हाताला त्यावेळेस काही काम लागले नाही. त्यामुळे राजेश्री याच संसाराचा गाडा ओढत होत्या. परंतु त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना आपले घरे कवडीमोलाला विकावे लागले. पाच वर्षांनी त्याच ठिकाणी बिल्डींगचा प्लॅन मंजूर झाला. त्यामुळे बालवाडीदेखील गेली. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करायचा, संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा असा यक्ष प्रश्न त्यांना सतावू लागला.त्याच वेळेस त्यांना सहयोग मंदिर भागात एक देव माणूस भेटला. त्याने त्यांना हक्काचे छप्पर तर दिलेच शिवाय विश्वनाथ यांच्या हाताला कामही दिले. सुमारे १५ वर्षे ते याच ठिकाणी वास्तव्याला होते. तुम्हाला मरेपर्यंत मी दरमहा ३ हजार देईन, अशी कबुलीदेखील या देव माणसाने दिली आहे. परंतु वाढत्या महागाईत या तीन हजारात घर कसे चालवायचे असा पेच त्यांना सतावत होता. त्यामुळे त्यांनी आपल्यातील कवी पुन्हा एकदा जागा केला आणि कविता करण्यास सुरवात केली. लोकमान्य टिळक, गांधीजी, मोदी, देशभक्ती, भक्तीगीते, भावगीते आदींसह इतर माध्यमातून देखील त्यांनी कविता केल्या. मुळात पहिल्यापासून त्यांना कविता करण्याची फार आवड होती. या कवितांचा संग्रह प्रकाशित करावा, अशी त्यांची फार इच्छा होती. परंतु आर्थिक गणिते जुळत नसल्याने त्यांना त्यात यश आले नाही. अखेर ‘महाराष्ट्राची यशोगाथा... भारतीय संस्कृती इतिहास’ अशा आशयाचा कवितासंग्रह स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने त्यांनी प्रकाशित केला. परंतु विविध महोत्सव, दारोदारी फिरून, नगरसेवक, आमदार आदींना गाठून हा कवितासंग्रह त्यांनीच विकण्याचे काम केले. आताच्या घडीला त्यांच्या २ हजाराहून अधिकच्या कविता तयार आहेत. परंतु आर्थिक क्षमता नसल्याने त्या प्रकाशित करण्याची इच्छा त्यांची अपूर्ण राहिली आहे. कसाबसा संसाराचा गाडा हाकत असतानाच, अचानक सहयोग मंदिराजवळील त्यांचे घरही मोडकळीस आल्याने त्यांना तेथून हलावे लागले. आज या दाम्पत्याची ऐकण्याची क्षमताही कमी झाली आहे. परंतु ते एकमेकांना साथ देत, या वयातही जगण्याचा संघर्ष करण्यासाठी तयार आहेत. त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील मदतीची अपेक्षा केली. परंतु त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. अखेर महापौरांना भेटा. त्याच यातून काहीतरी मार्ग काढतील अशी एक सूचना त्यांना परिचयाच्या व्यक्तीने केली. गेल्या आठवड्यात त्यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेऊन डोक्यावर छप्पर मिळविण्यासाठी विनवणी केली, घर नसेल तर आम्हाला वृद्धाश्रमात तरी प्रवेश मिळवून द्या, अशी विनंंती केली. परंतु महापौरांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधून यावर काही तोडगा काढता येऊ शकतो का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर रेंटलच्या घराचा पर्याय पुढे आला आणि अखेर मंगळवारी वर्तकनगर येथील रेंटलच्या घरात त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले. आता आम्हाला छप्पर मिळाले असून माझी पत्नी पुन्हा बालवाडी ते चवथीपर्यंत क्लासेस घेईल, मी माझा कविता संग्रह घरोघरी फिरून विकेन आणि आम्ही आमचा संसार पुन्हा नव्याने उभा करू. -पी. विश्वनाथवृद्ध दाम्पत्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही. त्यामुळे मला काही त्यांना मदत करता येऊ शकते का, याचा प्रयत्न केला. प्रशासनाने देखील मदतीचा हात पुढे केला आणि मी त्यांना रेंटलमध्ये घर देऊ शकले. -मीनाक्षी शिंदे, महापौर
अखेर ‘त्या’ दाम्पत्याला मिळाले डोक्यावर छप्पर !
By admin | Published: July 06, 2017 6:13 AM