लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : बीएसयूपी योजनेंतर्गत घर मिळण्याचे लाभार्थ्यांचे स्वप्न अखेर सोमवारी साकार झाले. कल्याणमधील साठेनगर, इंदिरानगर, डोंबिवलीतील कचोरे आणि इंदिरानगर परिसरातील बीएसयूपीच्या प्रकल्पात १६४ लाभार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभागृहात त्यांना घरांच्या चाव्यांचे आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरु त्थान अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या बीएसयूपी योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील कचोरे येथील १३२, कल्याण-इंदिरानगर ५२, डोंबिवली-इंदिरानगर समाधानवाडीत १०७ तसेच साठेनगर (उंबर्डे) येथील ४२ लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या दिवाळीत देण्यात आल्या होत्या. मात्र, अन्य लाभार्थ्यांना घरे देण्यास विलंब झाला होता.परिणामी, गुरुवारी डोंबिवलीतील इंदिरानगरमधील लाभार्थ्यांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली होती. त्या वेळी झालेल्या बैठकीत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सोमवारी त्यांना घरांच्या चाव्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, यासंदर्भात महापौर कार्यालयातून सादर झालेल्या प्रसिद्धिपत्रकावरून वाद उभा राहिला होता. या पत्रकात केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे होती. शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच १९ जूनला महापालिका परिसरातील पात्र लाभार्थ्यांना बीएसयूपी प्रकल्पातील सदनिकांचे वाटप, अशा आशयाच्या पत्रावर भाजपाने नाराजी व्यक्त केली होती. हा कार्यक्रम महापालिकेचा आहे. शिवसेना पक्षाच्या फंडातून लाभार्थ्यांना घरे मिळालेली नाहीत. केंद्र व राज्य तसेच महापालिकेच्या फंडातून बीएसयूपी प्रकल्प साकार झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रसिद्धिपत्रक काढणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी दिली होती. परंतु, सोमवारी झालेल्या चाव्यावाटपाच्या कार्यक्रमाला मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, भाजपा नगरसेवक संदीप गायकर, निलेश म्हात्रे, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, मुकुंद पेडणेकर, नगरसेविका प्रियंका भोईर, तनजिला मौलवी, माजी नगरसेवक तात्या माने, सहायक आयुक्त विनय कुलकर्णी, बीएसयूपी प्रकल्प अभियंता सुनील जोशी उपस्थित होते. मात्र, विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून सदनिकांचे वाटप झाले. यात डोंबिवली इंदिरानगर समाधानवाडीतील ४२, साठेनगर २३, कचोरे ४५ आणि कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगरमधील ५४ लाभार्थ्यांना चाव्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. झोपडीधारकांची जेथे जादा घरे होती, त्यांना बीएसयूपीच्या निकषाप्रमाणे एकच घर मिळाले आहे. त्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले आहे. हे पाहता केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निकषात बदल करण्यासंदर्भात विनंती केली जाईल, असे महापौर देवळेकर यांनी या वेळी सांगितले.
अखेर १६४ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न झाले साकार"
By admin | Published: June 20, 2017 6:17 AM