लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवानांसोबत आनंद साजरा केला.राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत बुधवारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी पाच वर्षांवरुन दोन वर्षांवर करण्याचा निर्णय देखिल घेण्यात आला.ठाण्याच्या दिवा भागात राहणाºया समाजसेविका अश्विनी यांनी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन केले होते. कोरोनामुळे आंदोलनाला मुंब्रा पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांनी घरातच उपोषण केले होते. या आंदोलनाची त्यांनी मार्च २०१९ पासून सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयांबाहेर देखील आंदोलन केले होते. या दरम्यान त्यांनी मुंडन आंदोलनही केले होते. त्या किडनी विकाराने ग्रस्त असून मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान, ‘लोकमत’नेही त्यांच्या या आंदोलनाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत वृत्त प्रसिद्ध करुन त्यांची मागणी लावून धरली होती. बुधवारी राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतल्यामुळे अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे.* आपल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला यश आल्यामुळे केंद्रे कुटुंबीयांनी पोलीस कर्मचारी तसेच राज्य राखीव दलातील जवानांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री, पर्यावरण मंत्री आणि पोलीस महासंचालक यांचे आभार मानले आहे.
* ‘लोकमत’चे विशेष आभारराज्य राखीव दलाच्या जवानांच्या बदलीच्या संदर्भात आंदोलन करुन आम्ही लढा दिला. परंतू, या लढयाबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने याचे वार्तांकन करुन या लढयात आमच्यासह एसआरपीएफच्या जवांनांना मोठी ताकद दिली. त्यामुळे ‘लोकमत’चेही विशेष आभार मानत असल्याचे अश्विनी केंद्रे यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले.