सदानंद नाईक
उल्हासनगर : अखेर... महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणुक १६ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी, १४ जूनला उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने, सत्ताधारी शिवसेनेला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. उल्हासनगर महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापतींपदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाने कोरोना प्रदूर्भावाची कारण देऊन, सभापती पदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. याविरोधात उपमहापौर भगवान भालेराव व नगरसेवक टोनी सिरवानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १५ दिवसात निवडणुका घेण्याचे आदेश शासनाने दिल्यावर, १६ जून रोजी स्थायी व प्रभाग समिती सभापती निवडणुकीची नोटीस महापालिका सचिव कार्यालयाने काढले. तर १४ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे. महापालिकेवर शिवसेना आघाडीची सत्ता असलीतरी, स्थायी समिती मध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र सत्ताधारी शिवसेना वेळेवर कोणते राजकीय डावपेच खेळते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली. असे आदेश देण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्णयात नोंदविले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून १६ जून रोजी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक होणार आहे. स्थायी समितीत भाजपचे बहुमत असल्याने त्यांचाच सभापती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका स्थायी समिती मध्ये एकून १६ सदस्य असून त्यापैकी भाजपचे ९ सदस्य आहेत. तर राष्ट्रवालदी व रिपाईचा प्रत्येकी एक सदस्य व शिवसेनेचे ५ सदस्य आहेत. समितीच्या १६ पैकी भाजप आघाडीकडे भाजपचे-९ व रिपाइं-१ असे एकून १० सदस्य आहेत.
स्थायी समिती सभापती पद भाजपकी रिपाइंकडे?
महापालिका सत्ताधारी शिवसेना गोटातुन भाजपा आघाडीत आलेले रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक आहेत. सभापती पदासाठी त्यांनी शिवसेना आघाडीतून भाजप गोटात उडी घेतल्याचे बोलले जाते. त्यांच्या भाजप आघाडीत येण्यामुळे शहर भाजपात जीव आल्याचे बोलले जाते. तर भाजपकडून टोनी सिरवानी यांचे नाव सभापती पदासाठी पुढे आहे. सभापती पदासाठी टोनी सिरवानी व भगवान भालेराव यांच्यात लस्सीखेस सुरू आहे.