ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाचे भाडे माफ करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आली होती. त्यात आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने वर्गणी गोळा करु नये असे शासनाचे निर्देश असल्याने सर्वच गणेश मंडळांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या मंडळांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आकारण्यात येणारे मंडप भाडे पूर्णपणे माफ करण्यात आले असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी दिली.
मागील वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट ओढवले आहे. ही सार्वजनिक मंडळे नागरिकांकडून वर्गणी जमा करुन गणेशोत्सव साजरा करीत असतात. परंतु नागरिकांकडून वर्गणी घेऊ नये असे शासनाचे निर्देश असल्यामुळे या मंडळापुढे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांचे मंडप भाडे माफ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा निर्णय सर्व नगरसेवक मंजूर करतील, या विश्वासाने महापौरांनी गणेश मंडळांचे मंडप भाडे माफ करण्यात येणार असल्याचे गुरूवारी जाहीर केले.