ठाणे - जोगीला तलावात भरणी टाकून त्याठिकाणी झालेली बांधकामे हटविण्याची कारवाई अखेर गुरवार पासून सुरु झाली. येथील रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. परंतु त्यांची मागणी विचारात न घेता पालिकेने ३०० पोलिसांच्याच बंदोबस्तात कारवाई सुरु केली. यामध्ये पहिल्या दिवशी १७५ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. ही कारवाई टाळण्यासाठी स्थानिकांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याचे आवाहन केले होते.
मागील दोन वर्षापासून सुरु झालेल्या कारवाई अंतर्गत ठाणे महापालिकेने शहरातील अनेक रस्ते, अतिक्रमणमुक्त केले आहेत. त्यानंतर मागील काही महिने थांबलेली ही कारवाई आता पुन्हा नव्याने सुरु झाली आहे. परंतु या कारवाईला प्रथमच स्थानिक रहिवाशांनी विरोधाची भुमिका घेऊन ४८ तासांचे अल्टीमेंटम दिले होते. त्यानुसार रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु असे असतांना देखील गुरुवार पासून पालिकेने कारवाईला पुन्हा सुरवात केली. त्यानुसार उथळसर भागातील जोगीला मार्केट येथील तलाव बुजवून त्याठिकाणी झालेल्या बांधकामांवर पालिकेने हातोडा मारला. यावेळी सुरवातीला अनेक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. परंतु पोलिस बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई सुरु केली. त्यानंतर या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात देखील धाव घेण्यात आली. परंतु तो पर्यंत पालिकेच्या माध्यमातून रहिवाशांची घरे खाली करुन त्या घरांवर बुल्डोजर फिरविण्यात आला.दरम्यान, या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरुपात खेवरा सर्कल येथील रेंटलच्या नव्या इमारतीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन महिन्यात त्यांना हक्काचे घर दिले जाईल असे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे तो पर्यंत या रहिवाशांकडून रेंटलच्या घरांचे कोणत्याही स्वरुपात भाडे घेतले जाणार नसल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. परंतु तरी देखील निवारा हक्क समन्वय समितीच्या माध्यमातून ही कारवाई टाळण्यासाठी चव्हाण यांच्याकडे विनवनी करण्यात आली. परंतु तरी देखील ही कारवाई सुरुच होती. आता राहोत आहोत, त्यापेक्षा चांगले घर मिळणार म्हणून आणि हक्काचे घर जातेय म्हणून काही रहिवाशांच्या डोळ्यात आसु तर काहींच्या डोळ्यात हसू दिसत होते. भर उन्हातच ही कारवाई होत असल्याने अनेकांचे संसार एका क्षणात उघड्यावर आले. ही कारवाई करतांना पालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. परंतु ही कारवाई नियमानुसारच केली गेली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान दुपारी दिडच्या सुमारास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कारवाईची घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. आता येथील बांधकामांवर कारवाई केल्यानंतर उर्वरीत १०० बांधकामांवर देखील दुसऱ्या टप्यात कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर येथील बुजविण्यात आलेल्या तलावाला नवसंजवणी दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.