ठाणे : माजी महापौर अशोक वैती यांना महापालिकेच्या सभागृहनेतेपदी बसण्याची संधी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यानंतरही केवळ शिंदे यांच्या उपस्थितीतच या खुर्चीवर बसण्याचा आग्रह वैती यांनी धरला होता. त्यांचा हट्ट पुरविण्यासाठी वेळ काढून सोमवारी रात्री उशीरा वैती यांना एकनाथ शिंदे यांनी त्यांना सभागृहनेतेपदाच्या खुर्चीवर बसवले.
सभागृहनेते पदासाठी सत्ताधारी शिवसेनेतून अनेक ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक होते. परंतु, शिंदे यांच्या पाठिंब्याने वैती यांना सभागृहनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, त्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीतच खुर्चीवर बसण्याचा आग्रह वैती यांचा होता. ६ डिसेंबर रोजी त्यासाठी जोरदार तयारी केली होती. परंतु, हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणाचा असल्याने शिंदे या दिवशी महापालिकेत आले नव्हते.
हा कार्यक्र म रद्द झाल्यानंतरही वैती यांनी सभागृहनेतेपदाच्या खुर्चीत बसणे टाळले होते. नरेश म्हस्के यांची नुकतीच महापौरपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा होत्या.