उल्हासनगर : बेकायदा बांधकामांची दखल घेऊन पालिका उपायुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांकडून आयुक्त गणेश पाटील यांनी बांधकामाची यादी मागवली. पवई चौकातील दुमजली बेकायदा बांधकामाची न्यायालयीन स्थगिती उठताच, अतिक्रमण विभागाने पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई सुरू केली.
शहरातील बेकायदा बांधकामाच्या असंख्य तक्रारी थेट आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे आल्या. अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया अतिक्रमण विभागाची झाडाझडती घेण्यास आयुक्तांनी सुरुवात केली. उपायुक्त संतोष देहरकर यांच्याकडे अवैध बांधकामाचा अहवाल मागितला. तसेच वर्षभरातील बांधकामाची यादी मागितल्याची माहिती उपायुक्त देहरकर यांनी दिली. यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केलेली बांधकामेही जैसे थे उभे राहिले आहे.कॅम्प नं-३, पवई चौकातील शिवमंदिर परिसरात एक दुमजी बांधकाम झाले होते. पालिकेने नोटीस देताच, बांधकाम धारकांनी न्यायालयातून स्थगिती आणली होती. ही स्थगिती उठवताच सहा. आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत यांच्या पथकाने पोलिस संरक्षणात पाडकाम कारवाई सुरू केली. महापालिकेचे वकिल अॅड. संजय ससाणे यांनी स्थगिती आदेश उठविल्याने त्यांचेही सर्वस्तरातून स्वागत होत आहे.