कल्याण : कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात शनिवारी राष्ट्रवादीचे कल्याण ग्रामीणचे ज्येष्ठ नेते डॉ. वंडार पाटील यांच्या गोळवली येथील निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते. परंतु, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर पुढची कृती अवलंबून असल्याचे काँग्रेसने यावेळी स्पष्ट केले.
कल्याण पश्चिमेत काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी प्रारंभी राष्ट्रवादीचे रमेश हनुमंते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार हनुमंते यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. कल्याण पूर्वेत राष्ट्रवादीचे प्रकाश तरे निवडणूक रिंगणात आहेत. येथे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसला तरी, या पक्षाचे शैलेश तिवारी हे अपक्ष लढत आहेत.
कल्याण पूर्वेत मनसेने उमेदवार दिला नाही. डोंबिवली मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार राधिका गुप्ते आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. जागावाटपात आपल्या वाट्याला येऊनही कल्याण ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार उभा केलेला नाही. याठिकाणी मनसेचे प्रमोद (राजू) पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर मतदारसंघातील हे चित्र स्पष्ट झाले आणि अजित पवार-राज ठाकरे यांच्यातील छुप्या समझोत्यावर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी या मथळ्याखाली लोकमतमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून प्रकाशझोत टाकला होता. हे वृत्त खरे असल्याची प्रचीती शनिवारी आली.
कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादीच्या छुप्या युतीची चर्चा होती; पण विधानसभा निवडणुकीतही उघडपणे पाठिंबा असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, वंडार पाटील यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या बैठकीला काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते डॉ. वंडार पाटील, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, सारिका गायकवाड, वल्ली राजन, अर्जुनबुवा चौधरी, दत्ता वझे या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे स्थानिक नेते माजी आमदार रमेश पाटील, शारदा पाटील, रवी पाटील, चंद्रकांत पाटील, संतोष केणे, रमेश म्हात्रे, तर मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील, प्रल्हाद म्हात्रेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.पाठिंब्याचा ठराव सर्वानुमते मंजूरबैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विचार समजून घेण्यात आले. यावर कल्याण ग्रामीण आणि पूर्व मतदारसंघात एकमेकांना पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि मनसेच्या वतीने मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.अन्यत्र काँग्रेसलाच पाठिंबा : कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघात काँग्रेस आणि मनसेचे उमेदवार आहेत. परंतु, आघाडीधर्म म्हणून आमचा पाठिंबा काँग्रेसच्याच उमेदवाराला राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी लोकमतशी बोलताना दिली.शनिवारी आघाडीतील मित्रपक्षांची बैठक बोलावली होती. पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही; परंतु आघाडी म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा आहे. बैठकीत ग्रामीणमध्ये मनसेला जाहीर पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला. परंतु, हा ठराव आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्या निर्णयानुसार आमची पुढची भूमिका ठरेल.- संतोष केणे, स्थानिक नेते, काँग्रेस