कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या बुधवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत पाच माजी नगरसेवकांचीच वर्णी लावण्यात आली. अशासकीय संघटनांचा आधार घेत त्यांनी महापालिकेत चंचुप्रवेश केला आहे.एकूण पाच जागांकरिता ८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी तिघांचे अर्ज अवैध ठरले. निवड झालेल्या ५ सदस्यांमध्ये विश्वनाथ राणे, प्रभुनाथ भोईर(शिवसेना), राजन सामंत, अभिमन्यू गायकवाड (भाजपा) आणि पवन भोसले (मनसे) यांचा समावेश आहे. पाच वर्षांकरिता स्वीकृतपदी निवड झाल्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. निवड झालेले सर्व सदस्य हे माजी नगरसेवक असल्याने स्वीकृतपदावर झालेली त्यांची निवड हे एक प्रकारे त्यांचे ‘राजकीय पुनर्वसन’ असल्याची चर्चा आहे.बुधवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत छाननीदरम्यान शिवसेनेचे संजय पावशे, जनार्दन म्हात्रे या दोघांचे अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्याने अवैध ठरविण्यात आले तर, पुरेसे संख्याबळ नसतानाही उमेदवारी दाखल करणारे राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. गणेश घोलप यांचाही अर्ज बाद ठरविण्यात आला. कल्याण-डोंबिवलीत अनेक नामांकित डॉक्टर, वकील, निवृत्त प्रशासकीय अधिकारी उपलब्ध असताना शिवसेना, भाजपा आणि मनसे यांनी आपल्या माजी नगरसेवकांच्या ‘अशासकीय संघटनेचा पदाधिकारी’ असण्याचा आधार घेत त्यांची राजकीय सोय लावली आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार घोलप यांनी निवड प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला असल्याने या सदस्यांच्या निवडीवर त्याचे सावट राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)केडीएमसीत विश्वनाथ राणे यांची स्वीकृतपदी निवड झाली. त्यांची पत्नी विनिता राणे या यापूर्वीच लोकांमधून निवडून आलेल्या आहेत. राणे पती-पत्नीच्या महापालिका प्रवेशामुळे महासभेतील हे सातवे मेहुण असेल. सध्या या महापालिकेत विकास म्हात्रे व कविता म्हात्रे, प्रकाश भोईर व सरोज भोईर, शैलेश धात्रक व मनीषा धात्रक, रमेश म्हात्रे व गुलाब म्हात्रे, राजेश मोरे व भारती मोरे, उपमहापौर विक्रम तरे व मोनाली तरे ही सहा जोडपी आहेत. राणेंच्या प्रवेशाने ही संख्या सात झाली आहे. स्वीकृतपदी निवड झालेले राणे व राजन सामंत यांची अनुभवी आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख राहिली आहे.
माजी नगरसेवकांचेच अखेर राजकीय पुनर्वसन
By admin | Published: February 11, 2016 2:44 AM