नवा फोटो... ठाण्यात अजित पवार गटाच्या फलकावरुन अखेर शरद पवार हद्दपार

By अजित मांडके | Published: December 13, 2023 02:57 PM2023-12-13T14:57:00+5:302023-12-13T14:57:55+5:30

शिवसेनेपोठापाठ राज्यात राष्ट्रवादीचे देखील दोन गट झाले.

Finally Sharad Pawar expelled from Ajit Pawar group's board in Thane | नवा फोटो... ठाण्यात अजित पवार गटाच्या फलकावरुन अखेर शरद पवार हद्दपार

नवा फोटो... ठाण्यात अजित पवार गटाच्या फलकावरुन अखेर शरद पवार हद्दपार

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर माझे फोटो देखील वापरू नका असे आदेश राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते. त्यानुसार त्यांच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते. मात्र वाढदिवस होताच, त्यांचे फोटो कार्यालय आणि इतर ठिकाणाहून देखील हद्दपार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या फोटोच्या जागी आता यशंवतराव चव्हाण यांनी जागा घेतल्याचे दिसत आहे. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून आजही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला जात असतांना दुसरीकडे  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मात्र शरद पवारांच्या आदेशाचे पालन उशीराने का होईना केल्याचे दिसत आहे.

शिवसेनेपोठापाठ राज्यात राष्ट्रवादीचे देखील दोन गट झाले. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार गटाने शरद पवारांची साथ सोडली आणि सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जात होता. त्यामुळे शरद पवार यांनी स्वत: माझ्या फोटो किंवा नावाचा कुठेही वापर करु नका असे आदेश अजित पवार गटाला दिले होते. परंतु त्यानंतरही शरद पवार यांना दैवत मानत त्यांचे फोटो अजित पवार गटाकडून वापरले जात होते. किंबहुना ठाण्यात अजित पवार गटाने राष्टÑवादीचे नवीन कार्यालय सुरु केले. त्याचा शुभांरभ ९ आॅगस्ट २०२३ रोजी झाली. त्यावेळी देखील प्रवेशद्वारावरील बॅनरवर शरद पवारांना पहिले स्थान देण्यात आले होते. तसेच कार्यालयात प्रवेश केल्यावर पहिला फोटो हा शरद पवार यांचाच होता. त्यानंतर इतर नेत्यांचे फोटो झळकत होते. शरद पवार हे आमचे दैवत असून ते आमच्या हृदयात असल्याने त्यांचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अशी भावनाही अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकाºयांनी व्यक्त केली होती.

त्यातही मागील काही महिने ठाण्यात तर शरद पवार गट विरुध्द अजित पवार गट यांच्यात चांगलीच शाब्दीक खडाजंगी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांची झडीच उठविली जात आहे. मात्र त्यानंतरही शरद पवारांचे स्थान अजित पवार गटाकडून कायम होते. मात्र आता वरीष्ठ पातळीवरच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचे चित्र मागील काही दिवसापासून दिसत आहे. त्यामुळे आता आमचे नेते अजित पवार हीच खुणगाठ पदाधिकाºयांनी बांधली असून त्यानुसार अजित पवार यांच्या ठाण्यातील ज्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील बॅनरवर आणि कार्यालयात शरद पवार यांचे फोटो होते, त्याची जागा आता यशंवतराव चव्हाण यांनी घेतल्याचे चित्र दिसत आहे. शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी झाला आणि १३ डिसेंबरच्या पहाटेच शरद पवार यांचे फोटो हद्दपार झाल्याचे दिसून आले आहे. त्यातही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बॅनरवर शरद पवार यांच्या फोटो न काढता, त्याच फोटोवर यशंवतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांनी दिलेल्या आदेशाचेच पालन आम्ही केल्याचे मत राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे. त्यामुळे आता याचे पडसाद कसे उमटतात हे आता आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Finally Sharad Pawar expelled from Ajit Pawar group's board in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.