कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सुरक्षा विभागातील बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर महिना उजाडला तरी मिळालेले नव्हते. ऑगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबर महिन्याच्या मध्यात होण्याची शक्यता असल्याने वेतनाअभावी त्यांची परवड सुरू होती. याबाबत लोकमतने शुक्रवारी ‘सुरक्षा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे थकले वेतन’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. या वृत्ताने जाग आलेल्या प्रशासनाने तातडीने दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा केले.
महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे ३४ कर्मचारी केडीएमसीत सेवा बजावत आहेत. मासिक वेतन साधारण महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दुसऱ्या आठवड्यात मिळते. परंतु, जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर महिना उजाडला तरी मिळालेले नव्हते. ऑगस्ट महिन्याचे वेतन ज्या वेळेला कर्मचाऱ्यांची हजेरी जाईल तेव्हा मिळते. तोपर्यंत सप्टेंबरचा दुसरा आठवडा उजाडेल, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे वेतनाविना गणेशोत्सव कसा साजरा करायचा असा यक्षप्रश्न त्यांना पडला होता. अखेर लोकमतने वेतन रखडल्याचे वृत्त देताच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले. लोकमतच्या वृत्ताने आम्हाला रखडलेले वेतन गणेशोत्सवापूर्वी मिळाल्याने गणपती बाप्पा पावला, अशी भावना व्यक्त करून कर्मचाऱ्यांनी लोकमतचे आभार मानले.
------------------------------------------------------